व्हिएतनाम – म्यानमार लढत बरोबरीत

नवी मुंबई – एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेच्या सी गटामध्ये व्हिएतनाम आणि म्यानमार यांनी आपल्या अखेरच्या गटसारळी सामन्यात २-२ गोल बरोबरी साधली. डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करत सामना रोमांचक केला.
व्हिएतनामने दोनवेळा पिछाडीवरुन पुनरागमन करताना बरोबरीचा महत्त्वपूर्ण गुण मिळवला. यासह त्यांनी सी गटामध्ये तिसरे स्थान मिळवले. मात्र, बाद फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना आता गुरुवारी होणाऱ्या बी गटातील सामन्यांच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.
म्यानमारने आक्रमक सुरुवात करताना सामन्याच्या दुसºयाच मिनिटाला गोल करण्याची संधी निर्माण केली होती. टुन विन थेइंगी हिने दिलेला वेगवान पास थॉ थॉने अचूकपणे घेतला खरा, पण तिला व्हिएतनामची गोलरक्षक त्रान थी किम थान हिचा बचाव भेदता आला नाही. यानंतर व्हिएतनामने जोरदार प्रत्युत्तर देताना पुढच्याच मिनिटाला म्यानमारच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत गोल करण्याची संधी जवळ जवळ साधलीच होती. एनग्युयेन थी मायन हिने म्यानमारची गोलरक्षक न्यु मे झिन हिला चकवले, पण तिने मारलेली किक क्रॉसबारला लागला. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत सामन्याची चुरस वाढवली. त्यातच १३व्या मिनिटाला व्हिएतनामच्या ह्युन न्हूकडून, तर १५व्या मिनिटाला म्यानमारच्या टुनचा हेडर चुकल्याने पुन्हा एकदा सामन्यात रंगत वाढली.
अखेर सामन्यातील पहिला गोल करण्यात म्यानमारला यश आले. एनग्युयेन थी थान न्हाने गोलक्षेत्रात मुसंडी मारलेल्या नोए खिन म्यातला खाली पाडले आणि म्यानमारला पेनल्टी मिळाली. ही संधी अचूकपणे साधत टुन विन थेइंगीने २८व्या मिनिटाला म्यानमारला १-० गोल असे आघाडीवर नेले. यानंतर व्हिएतनामने आणखी आक्रमक खेळ करत म्यानमारला जोरदार टक्कर दिली. यावेळी त्यांच्याकडून गोल करण्याच्या अनेक संधी चुकल्या. अखेर मध्यंतराच्या काही सेकंद आधी एनग्युयेन थी ट्युयेट डंग हिने गोल करत सामना १-१ गोल बरोबरीत आणला.
दुसऱ्या सत्रात व्हिएतनामने आक्रमक सुरुवात केली खरी, मात्र हुयन न्हू आणि एनग्युयेन थी ट्युयेट डंग दोघांनी गोल करण्याची संधी गमावली. यावेळी काहीसा सावध पवित्रा घेतलेल्या म्यानमारने संधी मिळताच पुन्हा वेगवान खेळ केला आणि ४९व्या मिनिटाला टुन विन थेइंगी हिने टुन खिन मारलारला शानदार पास दिला आणि मारलारने कोणतीही चूक न करता चेंडू गोलजाळ्यात ढकलला. म्यानमारने २-१ गोलची आघाडी मिळवल्यानंतर त्यांचा विजय मानला जात होता.
परंतु, म्यानमारच्या थॉ थॉकडून झालेल्या चुकीमुळे व्हिएतनामची एनग्युयेन थी माय गोलक्षेत्रात पडली आणि व्हिएतनामला पेनल्टी मिळाली. या संधीचा फायदा घेत ह्युन न्हू हिने चतुराईने चेंडू गोलजाळ्यात धाडला आणि सामना २-२ गोल बरोबरीत आणला. यानंतर हीच बरोबरी कायम राखत दोन्ही सामना अनिर्णित राखला. स्पर्धेत दुसऱ्यांदा व्हिएतनाम आणि म्यानमार यांना सामना बरोबरीत राहिल्याने समान गुणावर समाधान मानावे लागले.
Comments are closed.