पणजी: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉन क्रीडा प्रकारात गुरुवारी महाराष्ट्राने दोन रौप्य, दोन कांस्य पदके मिळवली. उस्मानाबादच्या योगिनी साळुंखेने वैयक्तिक आणि सांघिक रौप्य तसेच सांगलीच्या शहाजी सरगरच्या साथीने कांस्य पदकावर मोहर उमटवताना तिहेरी यश मिळवले.
याशिवाय शहाजीने पुरुष संघाच्या कांस्य पदकातही महत्त्वाचे योगदान दिले.
लेझर रन महिला वैयक्तिक प्रकारात महाराष्ट्राच्या योगिनीने (१४ मिनिटे, ५८.८९ सेकंद) रुपेरी यश मिळवले. या गटात हरयाणाच्या उज्ज्वलाने सुवर्ण आणि मध्य प्रदेशच्या नेहा यादवला कांस्य पदक मिळाले. लेझर रन मिश्र गटात योगिनीने शहाजीसमवेत (१६ मिनिटे, १४.४३ सेकंद) तिसरा क्रमांक मिळवला. या गटात हरयाणाच्या अंजू आणि रवी जोडीने सुवर्ण तर गोव्याच्या बापू गावकर आणि सीता गोसावी जोडीने रौप्य पदक मिळवले.
लेझर रन महिला सांघिक गटात रौप्य पदक मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात योगिनी, मुग्धा वाव्हाळ आणि ज्योत्स्ना यांचा समावेश आहे. या गटात मध्य प्रदेशने सुवर्ण पदक आणि गोव्याने कांस्य पदक मिळवले. लेझर रन पुरुष सांघिक गटात कांस्य पदक मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात मयंक चाफेकर, विजय फुलमाळी आणि शहाजी यांचा समावेश आहे. या गटात हरयाणा संघ सुवर्णपदकाचा आणि मध्य प्रदेश रौप्य पदकाचा मानकरी ठरला.