अव्वल स्थान पटकावण्यास मोहन बागान क्लब उत्सुक

गोवा – हिरो इंडियन सुपर लीगच्या एका तगड्या लढतीत बुधवारी (५ जानेवारी) फॉर्मात असलेला एटीके मोहन बागान क्लब हैदराबाद एफसीवर वर्चस्व राखून अव्वल स्थानी झेप घेण्यास उत्सुक आहे.
फातोर्डाच्या पीजीएन स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ टॉप फोरमधील असले तरी अँटोनिया लोपेझ हबास यांच्याकडून पदभार घेतलेल्या हुआन फर्नांडो यांच्या प्रशिक्षकपदाखालील मोहन बागानने सलग दोन विजय मिळवत सातत्य राखले आहे.

 

 

नॉर्थ ईस्ट युनायटेड पाठोपाठ एफसी गोव्यावर मात करणाऱ्या एटीकेने ८ सामन्यांत १४ गुण मिळवत अव्वल चार संघांत स्थान पटकावले आहे. मात्र, बुधवारचा प्रतिस्पर्धी तुलनेत कडवा आहे. हैदराबादने अपयशी सुरुवातीनंतर सलग सात सामन्यांत पराभव पाहिलेला नाही. त्यामुळे मोहन बागानचा कस लागेल.दुसऱ्या स्थानी असलेल्या हैदराबादच्या खात्यात ८ सामन्यांतून १५ गुण आहेत. सातत्य राखल्यास गतविजेता मुंबई सिटी एफसीला मागे टाकून त्यांना अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. दोन्ही संघांमध्ये केवळ एका गुणाचा फरक आहे. मोनॅलो मार्केझच्या प्रशिक्षकपदाखालील क्लबने मागील सामन्यात ओदिशा एफसीवर ६-१ असा मोठा विजय मिळवत दोन बरोबरींची मालिका खंडित केली.

 

 

स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. उभय संघांची खेळाची स्टाइल जवळपास सारखी आहे. मात्र, मागील दोन आठवड्यांतील कठोर मेहनत पाहता हैदराबादवर विजय मिळवण्याची क्षमता एटीकेमध्ये आहे. त्यादृष्टीने सातत्य राखण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे मोहन बागानचे मुख्य प्रशिक्षक हुआन फर्नांडो यांनी म्हटले आहे. लिस्टन कोलॅकोचा फॉर्म ही बागानसाठी जमेची बाजू आहे. या २३ वर्षीय खेळाडूने पाच गोल केलेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक गोल करण्याचा मान त्याला जातो. मागील दोन सामन्यांत कोलॅकोने सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. आयएसएलमध्ये एकाहून अधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय फुटबॉलपटू आहे. रॉय क्रिष्नाने चार गोल करताना आणि तितकेच गोल करण्यास मदत करताना सांघिक कामगिरी उंचावण्यात मोठा वाटा उचलला आहे.

 

 

मजबूत बचाव हे हैदराबाद एफसीचे बलस्थान आहे. त्यांनी १८ गोल चढवताना केवळ ७ खाल्लेत. आठव्या हंगामात कमीत कमी गोल खाणारा तो एकमेव क्लब आहे. मागील सामन्यात ओदिशा एफसीविरुद्धच्या मोठ्या विजयाने हैदराबादचा आत्मविश्वास उंचावला आहे. बार्थोलोमेव ऑगबेचे याचा बहारदार खेळ त्यांच्या सक्षम वाटचालीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरला आहे. नायजेरिन खेळाडून त्याची ८ सामन्यांतील वैयक्तिक गोलसंख्या आठवर नेली आहे. सर्वाधिक गोल करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या गोल्डन बुटसाठी तो प्रबळ दावेदार आहे.
ऑगबेचे हा महान खेळाडू आहे. मागील चार हंगामात त्याने चार क्लबचे प्रतिनिधित्व केले. त्याचा अनुभव हैदराबाद एफसीच्या कामी येत आहे. मात्र, एका खेळाडूवर कायम विसंबून राहणे, परवडणारे नाही. ऑगबेचे याला अन्य सहकाऱ्यांकडून सक्षम साथ अपेक्षित आहे, असे प्रशिक्षक मार्केझ यांचे म्हणणे आहे.

You might also like

Comments are closed.