छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): विभागीय क्रीडा संकुल समितीची शुक्रवारी सामाजिक न्याय मंत्री,तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. संकुलात आतापर्यंत खेळाडूंकडून घेतले जाणारे दुहेरी शुल्क आता बंद करण्यात येणार असून केवळ प्रशिक्षकांकडून पैसे घेतले जाणार आहे. त्याचबरोबर १८ वर्षाखालील मुले-मुलांना मोफत आणि ६० वर्षावरील जेष्ठांना अाता केवळ १०० रुपयांत वार्षिक नोंदणी शुल्क भरुन फिरता येईल, असा निर्णय पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी घेतला.
गेल्या अनेक वर्षापासून विभागीय क्रीडा संकुल समितीचे बैठकच झाली नसल्याने सर्व सावळा गोंधळ निर्माण झाला होता. त्यातुनच हर्षकुमारने २१ कोटी रुपयांचा घोटाळा करुन सर्वांना धक्का दिला. न्यायालयाच्या निकालानंतर अॅथलेटिक्सच्या १०.३५ कोटीचे सिंथेटिक ट्रॅकचे ट्रेंडर मिळालेल्या कंपनीला त्वरीत बोलावून पूर्वीच्या खर्चात काम करण्यास तयार आहे की नाही, याची विचारणा केली जाईल. त्यानंतर नवीन ट्रेंडरचा विचार केला जाईल. येत्या महिन्याभरात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
न्यायालयातून पैसे मिळण्यासाठी अर्ज
हर्षच्या आर्थिक घोटाळ्यातून जप्त करण्यात आलेली रक्कम संकुलाकडे वळती करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्याची सुचना पोलिस आयुक्तांनी बैठकीत केली. पैसे नसल्याने संकुलाचे ठप्प पडलेले काम पुन्हा सुरू होईल.
खेलो मोर अॅपवर होणार नोंदणी
आता संकुलात प्रवेशाच्या नोंदणीसाठी खेलो मोर सारखा अॅप आणला जाणार आहेे. खेळाडू, फिरायला येणाऱ्या नागरिकांना अॅपवर घरबसल्या नोंदणी करता येईल. त्याचबराेबर याच अॅपवर त्यांना शुल्क भरण्याची सुविधा असेल. क्रीडाधिकाऱ्यांकडे संकुलात किती जणांनी प्रवेश घेतला आहे, त्याचा सध्या आकडाच उपलब्ध नाही.
थकित करावर तोडगा काढणार संकुलाकडे १ कोटी ६७ लाखांचा कर थकला आहे. त्यासंबंधी बैठक घेऊन करात सुट देता येईल का, याची चाचपणी करण्यात येईल. लवकरच कराचा प्रश्न सोडवणार असल्याचे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी म्हटले. कोविडच्या काळात मनपाने संकुल ताब्यात घेतले होते. ते आपतकालीन अधिग्रहण होते, त्यामुळे त्याचे मनपाला लावलेले भाडे रद्द करण्यात आले.
युवा वसतिगृहचे महिन्याभरात उद्घाटन
तब्बल चार कोटी रुपये खर्च करुन १०० जणांची व्यवस्था असलेले युवा वसतिगृह तयार करण्यात आले आहे. मात्र, उद्घाटनाअभावी ते पडून होते. आता किरकोळ दुरुस्ती करून त्याचे महिना भरात उद्घाटन करण्यात येईल. येथे वाचनालय, कँटिंग, संगणक कक्ष, कॉन्फरन्स हॉलसह येथे वातानुकूलीत व्यवस्था आहे.
इंड्युरन्सच्या नफ्यावर घेणार ३० टक्के शुल्क
इंड्युरन्स कंपनी संकुलात टेनिस सेंटर व जीम चालवते. त्यांच्याकडून शुल्क वसुलीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. आता इंड्युरन्सची बॅलनशीट पाहुन त्यांच्या नफ्यावर ३० टक्के शुल्क लावण्यात येणार आहे.
मल्टिपर्पज हॉलमध्ये रोल ऑन बॅडमिंटन सिंथेटिक कोर्ट लागणार
संकुलातील मल्टिपर्पज हॉल हा केवळ बॅडमिंटनसाठी नसल्याने १२ ऐवजी केवळ ६ कोर्टवर सिंथेटिक कोर्ट बनवण्यात येणार आहे. ते देखील रोल ऑन स्वरुपाचे असेल. इतर स्पर्धेवेळी ते काढून घेता येईल. या कामासाठी ४५ लाखांची मान्यता मिळाली आहे.
सोलर लाईट, संरक्षक भिंत बांधणार
संकुलात रात्री संपूर्ण आधार असतो, त्यामुळे परिसरात सोलार लाईट बसवण्यात येईल. अंधाराचा फायदा घेत काही बाहेरी व्यक्ती चुकीचे कामे करताना येथे आढळले आहे. त्यामुळे या गोष्टीला आळा बसेल. बास्केबॉल कोर्टला संरक्षक भिंत बांधली जाईल व जाळी लावण्यात येईल. त्यासाठी ७ लाख मंजूर झाले आहे.