टाटा स्टील (TATA STEEL )बुद्धिबळ स्पर्धेतील मास्टर्स आणि चॅलेंजर्स विभागात अनुक्रमे भारताचा विदित गुजराथी आणि अर्जुन इरिगेसी यांनी आघाडी मिळवली आहे. याव्यतिरिक्त आर. प्रज्ञानंदने पहिल्या विजयाची नोंद केली.मास्टर्स विभागातील चौथ्या फेरीच्या सामन्यात ग्रँडमास्टर विदितने रशियाच्या आंद्रे इसिपेन्कोला बरोबरीत रोखले. विदितच्या खात्यात चौथ्या फेरीअंती ३ गुण असून जगज्जेत्या मॅग्नल कार्लसनसह एकूण सहा जण २.५ गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहेत. तिसऱ्या फेरीत पराभव पत्करणाऱ्या प्रज्ञानंदने स्वीडनच्या निल्स ग्रँडेलियसला धूळ चारून एकूण गुणसंख्या दोनवर नेली. कार्लसनला जॉर्डन फोरेस्टविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. पाचवी फेरी गुरुवारी होईल.
चॅलेंजर्स विभागात १८ वर्षीय अर्जुनने रोवन वोगेलला नमवून आघाडी मिळवली. चौथ्या फेरीअखेर अर्जुनच्या खात्यात ३.५ गुण जमा आहेत. सूर्यशेखर गांगुलीने डॅनिएल डर्धाला बरोबरीत रोखून एकूण गुणसंख्या २.५वर नेली. तो सध्या संयुक्तरीत्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.