जबलपूर- खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये पुण्याच्या पृथा वर्टिकर, जेनिफर वर्गिसने टेबल टेनिस दुहेरीत सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्राच्या पदकांचा सिलसिला सुरु केला. स्पर्धेचा दुसराच दिवस असून पदकतालिकेत यजमान मध्य प्रदेश ४ सुवर्णपदकांसह आघाडीवर आहे. महाराष्ट्राची प्रत्येकी १ सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके असून, ते दुसऱ्या स्थानावर आहेत. उत्तर प्रदेशाने तिसरे स्थान मिळविले आहे.
सुवर्ण हॅटट्रिक
सुवर्णपदकाच्या दावेदार असलेल्या पृथा वर्टीकर व जेनिफर वर्गीस यांनी दुहेरीत सुवर्णकमाई करताना महाराष्ट्राच्याच तनिष कोटेचा-रिशा मिरचंदानी जोडीचा १३-११, ११-९, ११-७ असा पराभव केला. सामना संपल्यानंतर पृथा व जेनिफर यांनी सांगितले,” विजेतेपदाची खात्री होती परंतु आमच्याच सहकाऱ्यांविरुद्ध अंतिम सामना होईल, अशी आम्ही अपेक्षा केली नव्हती. अर्थात अंतिम सामन्यात आमच्याच सहकारी प्रतिस्पर्धी होत्या त्यामुळे आम्हाला देखील खेळाचा आनंद घेता आला. ” मुलांच्या गटात ब्राँझपदकासाठी झालेल्या लढतीत मोदी व मुळ्ये यांनी पश्चिम बंगालच्या अंकुर भट्टाचार्य व सौम्यदीप सरकार जोडीचा ११-६, ११-५, ११-८ असा पराभव केला. कास्यपदक मिळवल्यानंतर मोदी व मुळ्ये यांनी सांगितले,”महाराष्ट्राकरिता पदक मिळविल्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटत आहे. आम्ही सराव शिबिरात भरपूर सराव केल्यामुळे आम्हाला एकमेकांच्या खेळाचा अभ्यास होता आणि त्याप्रमाणे आम्ही या सामन्यात समन्वय ठेवण्यात यशस्वी झालो.”

महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक व ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू सुनील बाब्रस यांनी खेळाडूंचे कौतुक करत सांगितले,” आमच्या खेळामध्ये पदके मिळवणार याची आम्हाला खात्री होती आणि त्याची पूर्तता आमच्या खेळाडूंनी केली. संघातील सर्वच खेळाडू अतिशय गुणवान आहेत हे त्यांनी दाखवून दिले.”

मुष्टीयुद्धामध्ये देविकाचे पदक निश्चित
मुष्टीयुद्धामध्ये युवा जागतिक विजेत्या महाराष्ट्राच्या देविका घोरपडे हिने उपांत्य फेरीत स्थान मिळवित पदक निश्चित केले. स्पर्धेच्या ५२ किलो गटात देविकाने हरियाणाच्या अंजली कुमारी हिचा सहज पराभव केला. महाराष्ट्राच्या अभिषेक जांगिड, कुणाल घोरपडे यांनीही आपली आगेकूच कायम राखली. भोपाळ येथील तात्या टोपे क्रीडा नगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील ७५ किलो गटात अभिषेक याने अरुणाचल प्रदेशचा खेळाडू रिंचन देपकाचा एकतर्फी पराभव केला तर, ७१ किलो गटात महाराष्ट्राच्या कुणाल घोरपडेला आसामच्या हेमंत छेत्रीकडून पुढे चाल मिळाली.
मुलांच्या ५४ किलो गटात महाराष्ट्राच्या नीरज राजभचे आव्हान अगदीच किरकोळीत संपुषटात आणले.

नेमबाजीत पदकांच्या आशा कायम
महाराष्ट्राच्या रणवीर काटकर व पार्थ माने यांनी दहा मीटर्स एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी स्थान मिळवले. प्राथमिक फेरीनंतर रणवीर चौथ्या स्थानी आहे. प्राथमिक फेरीत त्याने ६२५.६ गुण नोंदविले. पार्थ६२४.९ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
बॅडमिंटन – नाईशा उपांत्य फेरीत
आंतरराष्ट्रीय क्रमवारीत ८३ व्या स्थानावर असलेल्या १४ वर्षीय बॅडमिंटनपटू नाईशा कौरने बॅडमिंटन एकेरीत उपांत्य पेरी गाठली. दुसऱ्या फेरीत नाईशाने दुसऱ्या मानांकित खेळाडू नाईसा करियप्पाचा पिछाडीवरून १७-२१, २१-१८, २१-१३ असा पराभव केला. पहिला गेम गमाविल्यानंतरही तिने दाखवलेला संयम कमालीचा निर्णायक ठरला.

खो-खो मध्ये पदकाकडे भक्कम पाऊल
महाराष्ट्राच्या मुले मुलींच्या संघांनी आपले निर्विवाद वर्चस्व राखत सलग चौथ्यांदा खो-खो क्रीडा प्रकारात उपांत्य फेरी गाठली. दिपाली, अश्विनीच्या चमकदार खेळाच्या जोरावर मुलींनी पंजाबचा १ डाव ४ गुणांनी पराभव केला. पहिल्याच डावांत पंजाबचे १४ गडी टिपत महाराष्ट्राच्या मुलींनी विजय निश्चित केला. महाराष्ट्राच्या मुलांनी किरण वसावे, सचिन पवार यांच्या सुरेख खेळाच्या जोरावर पश्चिम बंगालचा चुरशीच्या लढतीत ७ गुणांनी पराभव केला.

योगासन प्रकारात आगेकूच
योगासन स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जोरदार मुसंडी मारली. पहिल्या दिवशी दोन प्रकारात झालेल्या स्पर्धा प्रकारातील पात्रता फेरीतून महाराष्ट्राच्या चौदा खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली असून, महाराष्ट्राला किमान पाच सुवर्णपदकांची अपेक्षा असल्याचे महाराष्ट्राचे प्रशिक्षक रवि कुमठेकर यांनी सांगितले.
१८ वर्षांखालील (पारंपरिक) मुली – रुद्रांशी भावे (१३१.०६), निरल वाडेकर, तृप्ती डोंगरे, स्वरा गुजर,
मुले – निबोध पाटिल, अंश मयेकर, स्वराज फिस्के, अरविंद साबावत
१८ वर्षांखालील मुली (कलात्मक) – निरल वाडेकर, वैदेहीड मयेकर, तन्वी रेडीज
मुले – सुमित बंडाले, स्वराज फिस्के, प्रीत बोरकर
बास्केटबॉलमध्ये दुसरा पराभव
बास्केटबॉल प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. या मुळे महाराष्ट्राचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यासारखे आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात तमिळनाडूने महाराष्ट्राचा ९५-६२ असा पराभव केला. तमिळनाडूकडून बी. हरिणीने सर्वाधिक २२ गुणांची नोंद केली. तिला सुहासिनी (१५) आणि हरिमा (१५) या दोघींची साथ मिळाली. महाराष्ट्राकडून मुस्कान सिंग आणि भूमिका सर्जेने प्रतक्येकी ११ गुणांची नोंद केली. कर्णधार रिचा रवी आणि अनन्या भवसारने प्रत्येकी १२ गुण नोंदवले. महाराष्ट्राचा अखेरचा सामना उद्या राजस्थानशी होणार आहे.