दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्या दरम्यानच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना केपटाऊन येथे खेळला गेला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यासह यजमान संघाने भारताला वनडे मालिकेत व्हाईटवॉश दिला. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक सामनावीर व मालिकावीर ठरला.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाने ही मालिका यापूर्वीच गमावली होती. या सामन्यात भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दौऱ्यावरील आपला पहिला सामना खेळणाऱ्या दीपक चहरने जानेमन मलानला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा धावबाद झाला. मार्करमही १५ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही.
क्विंटन डी कॉक व रासी वॅन डर ड्युसेन यांनी चौथ्या गड्यासाठी शतकी भागीदारी रचली. डी कॉकने आपल्या कारकीर्दीतील १७ वे शतक या सामन्यात साजरे केले. तर, ड्युसेनने अर्धशतकी खेळी केली. डी कॉक १२४ तर ड्युसेन ५५ धावा करून बाद झाला.अखेरीस, डेव्हिड मिलरच्या ३९ व प्रिटोरीयसच्या २० धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने २८७ पर्यंत मजल मारली. भारतासाठी प्रसिद्ध कृष्णा याने सर्वाधिक तीन बळी मिळविले.
दौऱ्याचा शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघाला २८८ धावांचे आव्हान पार करायचे होते. मात्र, कर्णधार राहुल ९ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर शिखर धवन व विराट कोहली यांनी ९८ धावांची भागीदारी करत भारताला सामन्यात कायम ठेवले. धवन ६१ धावांवर बाद झाल्यानंतर रिषभ पंत खाते ही खोलू शकला नाही. विराट वैयक्तिक ६५ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर यांनी अनुक्रमे ३९ व २६ धावांचे योगदान दिले.
भारतीय संघ पराभवाच्या छायेत असताना अष्टपैलू दीपक चहर संघाच्या मदतीला धावला. त्याने जयंत यादव व जसप्रीत बुमराह या तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत संघाला विजयाच्या दिशेने नेले. त्याने केवळ ३१ चेंडूत आपल्या कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक साजरे केले. भारताला विजयासाठी १० गावांचे आवश्यकता असताना तो ५४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर बुमराहही आणखी दोन धावांची भर घालून माघारी परतला. अखेरच्या षटकात भारतीय संघाला विजयासाठी ६ धावांची गरज होती. मात्र, षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर युजवेंद्र चहल बाद झाल्याने भारताला ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.