औंरगाबाद- भारतीय खेल प्राधिकरणाने जिम्नॅस्टिक वरिष्ठ पुरुष व महिला संघासाठी ८ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२१ दरम्यान, राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. नवी दिल्ली येथील आयजी स्टेडियममध्ये १६ पुरुष व १६ महिला जिम्नॅस्टसचे संभाव्य भारतीय संघाचे सराव शिबीर होईल. या शिबीरासाठी औरंगाबादच्या सिद्धी हत्तेकर हिची निवड करण्यात आली आहे.
सिद्धी हत्तेकरसह महाराष्ट्रातील चार जिम्नॅस्ट्स आहेत. यात श्रद्धा तळेकर (क्रीडा प्रबोधिनी,पुणे), वैदेही देऊळकर (मुंबई) तर पुरुषांमध्ये ओंकार शिंदे (ठाणे) यांची निवड झाली आहे. तसेच या सराव शिबिरात जिम्नॅस्टिकला मार्गदर्शन करण्यासाठी एनसीओई साई औंरगाबादचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे यांची निवड झाली आहे.
जिम्नॅस्टिक्सची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा १८ ते २४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान जपान येथील टोकियो शहरात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी संभाव्य भारतीय संघाची निवड चाचणी १४ व १५ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे. सिद्धी हत्तेकर ही आज प्रशिक्षण शिबिरासाठी दिल्लीला रवाना झाली आहे. सिद्धी हत्तेकर ही देवगिरी महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण घेत आहे.
सिद्धी हत्तेकर व रामकृष्ण लोखंडे यांच्या संभाव्य भारतीय संघातील निवडीबद्दल साईचे संचालक विरेंद्र भांडारकर, प्रशिक्षक पिंकी देव, जिम्नॅस्टिक राज्य संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव डॉ. मकरंद जोशी, जिल्हा संघटनेचे आदित्य जोशी, संकर्षण जोशी, हर्षल मोगरे, तसेच देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर, उपप्राचार्य रजनीकांत गरुड, श्री. निपाने, क्रीडा संचालक शेखर शिरसाठ, राकेश खैरनार यांनी अभिनंदन केले.