भारताचा उदयोन्मुख बॅडिमटनपटू लक्ष्य सेनने खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. पुरुष दुहेरीतील जोडी चिराग शेट्टी-सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी यांनीही या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रामुख्याने अग्रमानांकित पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
२० वर्षीय लक्ष्यने रविवारी इंडिया खुल्या स्पर्धेचे प्रथमच जेतेपद पटकावले आहे . परंतु ऑक्टोबर महिन्यापासून सलग नऊ स्पर्धामध्ये सहभागी झाल्याने लक्ष्यने विश्रांती घेण्याचे ठरवले आहे. सुपर ३०० दर्जाच्या या स्पर्धेत महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सिंधूसमोर भारताच्याच तान्या हेमंतचे आव्हान असेल. सायना नेहवालची तेरेझा स्वॅबीकोव्हाशी गाठ पडेल.