दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, निकाल नक्की वाचा;

या खेळाडूंनी केली नेत्रदीपक कामगिरी

मोहाली –भारत आणि श्रीलंका सामन्याचा आजचा दुसरा दिवस होता.

पहिला कसोटी सामना मोहाली येथे खेळला जातोय. या सामन्याचा आजचा दुसरा दिवस होता. आजच्या दिवसाचा खेळ संपला असून भारतीय फलंदाजांनी आज नेत्रदीपक कामगिरी केली. भारताने ५७४ धावांवर डाव घोषित केला. तर दिवसाअखेर श्रीलंकेची स्थिती चार गडी बाद १०८ धावा अशी राहिली. आजच्या खेळात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने धडाकेबाज फलंदाजी करत तब्बल १७५ धावा केल्या. या कामगिरीमुळे आजचा दिवस जडेजाच्या नावावर होता.

कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाकडून सातव्या विकेटसाठी आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा मैदानात उतरले. या दोघांनी सुरुवातीपासून धमाकेदार कामगिरी करत भारताचा धावफलक फिरता ठेवला. या जोडगोळीने एकूण १३० धावांची भागिदारी केली. या दोघांच्या जोडीने मैदानावर पाय घट्ट रोवले होते. मात्र अश्विन ६१ धावांवर झेलबाद झाला. अश्विन तंबूत परतल्यानंतर जडेजा डगमगला नाही. त्याने षटकार तसेच चौकार लगावत दीडशतकी खेळ पूर्ण केला. ही कामगिरी करताना जडेजाला मोहम्मद शमीने साथ दिली. त्याने ३४ चेंडूमध्ये २० धावा केल्या. तर जडेजाने २२८ चेंडूमध्ये १७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १७५ धावा केल्या.

भारताने ५७४ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर श्रीलंकन फलंदाज दिमुथ करुणारत्ने आणि लाहिरु थिरिमाने भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याला गाठण्यासाठी मैदानात उतरले. मात्र ही जोडी जास्त वेळ मैदातान तग धरू शकली नाही. आर. अश्विनच्या गोलंदाजीपुढे लाहिरूने हात टेकले आणि तो १७ धावांवर बाद झाला. जडेजाने गोलंदाजीमध्येही कमाल करुन करुणारत्नला २८ धावांवर तंबूत परत पाठवले. तर ३३ वे षटक सुरु असताना अँजेलो मॅथ्यूजचा त्रिफळा उडाला. मॅथ्यूजने ३९ चेंडूमध्ये २२ धावा केल्या. तर धनंजया सिल्वा फक्त एक धाव करुन अश्विनच्या चेंडूवर बाद झाला. श्रीलंकन फलंदाज आज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. श्रीलंका अजूनही ४६६ धावांनी पिछाडीवर आहे.

 

याआधी कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भारताने ८५ षटकांत सहा गडी बाद ३७५ धावा केल्या. पहिल्या दिवशी ऋषभ पंतचे चार धावांनी शतक हुकले. त्याने ९७ चेंडूंमध्ये ९६ धावा केल्या. तर हनुमा विहारीने १२८ चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या. विराट कोहलीचा हा शंभरावा कसोटी सामना आहे. मात्र कोहली ४५ धावा करुन तंबूत परतला.

 

भारत (पहिला डाव) – ८५ षटकांत ६ बाद ३५७ धावा (ऋषभ पंत ९६, हनुमा विहारी ५८)

भारताच्या एकूण धावा – १२९ षटकांत ५७४ धावा, एकूण ८ गडी बाद (रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी नाबाद)

 

श्रीलंकेच्या दिवसाअखेर धावा -४३ षटकांत १०८ धावा, ४ गडी बाद.

 

You might also like

Comments are closed.