तेलंगणा-वरंगल तेलंगणा येथे आयोजित केलेल्या साठाव्या खुल्या गटाच्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंची चमकदार कामगिरी सुरू आहे.स्पर्धेत दहा हजार मीटर गटातून धावताना नाशिकच्या संजीवनी जाधव हिने महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले. यापूर्वी याच स्पर्धेत तिने कांस्यपदकाची कमाई केली आहे.
वरंगल येथील राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकचे धावपटूंनी आपली छाप सोडली आहे.विशेषतः महिला गटातून नाशिकच्या धावपटूंनी महाराष्ट्राला आतापर्यंत एकूण चार पदके जिंकून दिली आहेत. महिलांच्या पाच हजार मीटर गटातून नाशिकच्या कोमल जगदाळे निरोप तर संजीवनी जाधव हिने कांस्यपदकाची कमाई केली होती. तसेच कोमलने या स्पर्धेत आणखी एक रौप्यपदक पटकावले आहे. त्यापाठोपाठ संजीवनी जाधव हिने दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभाग घेताना सुवर्णपदकाची कमाई केली. 34 मिनिटे 20.03 सेकंद अशी वेळ नोंदवताना तिने प्रथम क्रमांक पटकावला. या गटातून रेल्वेकडून सहभागी झालेल्या कविता यादव हिने 35 मिनिटे 57.46 सेकंद अशी वेळ नोंदवत द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक पटकावले. उत्तर प्रदेशच्या ज्योतीने 36 मिनिटे 37.90 सेकंद वेळ नोंदवत तृतीय क्रमांकासह कांस्यपदक पटकावले.