अहमदाबाद -शाम्स मुलानीच्या (५/६४) प्रभावी फिरकीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ओडिशाचा एक डाव आणि १०८ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह मुंबईने ड-गटात सर्वाधिक १६ गुणांसह अग्रस्थान पटकावतानाच तीन हंगामांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठली.
मुंबईच्या पहिल्या डावातील २४८ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना ओडिशाने ५ बाद ८४ धावांवरून चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. परंतु मुलानी आणि तनुष कोटियन (३/३१) या फिरकी जोडीने पुन्हा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना हैराण केले. त्यामुळे दिवसाच्या पहिल्या १५ षटकांतच एकूण १४० धावांवर ओडिशाचा संघ गारद झाला. मुंबईने डावाने विजय मिळवल्यामुळे बोनस गुणही कमावला. पहिल्या डावात १६५ धावांची खेळी साकारणारा सर्फराज खान सामनावीर ठरला. अन्य लढतीत सौराष्ट्रने गोव्याला नमवूनही १४ गुणांसह दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
मुंबईसह पंजाब, कर्नाटक, बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या संघांनीही आगेकूच केली. तर झारखंड आणि प्लेट गटाचे विजेते नागालँड यांच्यात उपउपांत्यपूर्व लढत १२ मार्चपासून होईल. त्यानंतर जूनमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होतील.
संक्षिप्त धावफलक
ओडिशा (पहिला डाव) : २८४
मुंबई (पहिला डाव) : ९ बाद ५३२ (डाव घोषित)
ओडिशा (दुसरा डाव) : ४२ षटकांत सर्व बाद १४० (अभिषेक राऊत ५९; शाम्स मुलानी ५/६४, तनुष कोटियन ३/३१)