अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची मुलगी वामिका यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मुलीच्या जन्मानंतर लगेचच अनुष्का आणि विराटने माध्यमांना विनंती केली होती की वामिकाचा फोटो कोणीही घेऊ नये. ते दोघेही तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत नव्हते. सोशल मीडिया आणि कॅमेऱ्यांपासून इतके दिवस वामिकाला हे दोघेही दूर ठेवत होते. मात्र एका सामन्याच्या दरम्यान वामिकाचा फोटो घेण्यात आला. तो आता व्हायरल होत आहे. यावरच आता विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विराट कोहली म्हणतो, आम्हाला कळालं आहे की काल मैदानावर आमच्या मुलीचा फोटो घेण्यात आला आणि तो वेगाने व्हायरल होत आहे. आम्हाला सांगायचं आहे की आमचं त्यावेळी लक्ष नव्हतं आणि कॅमेरा आमच्याकडे आहे याची आम्हाला जाणीव नव्हती. यावर आमची भूमिका आणि विनंती आधीप्रमाणेच असेल. वामिकाचे फोटो कोणीही घेऊ नये, प्रसिद्ध करू नये. त्यासाठीची कारणं आम्ही यापूर्वीही दिली आहेत.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने आत्तापर्यंत आपल्या लेकीचा फोटो कुठेही प्रसिद्ध होऊ दिला नव्हता. माध्यमांनाही तिचा फोटो न घेण्याचं आवाहन दोघांनीही केलं होतं. मात्र, भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान केपटाऊनमध्ये झालेल्या तिसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यादरम्यान अनुष्का शर्मा वामिकासोबत सामना पाहत असताना अचानक कॅमेरा त्यांच्यावर गेल्याने वामिकाचा फोटो घेतला गेला. काही वेळातच तो प्रचंड व्हायरल झाला.