दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन यांनी शुक्रवारी इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत शानदार विजयांची नोंद करीत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. महिला एकेरीत अग्रमानांकित आणि माजी विश्वविजेत्या सिंधूने ३६ मिनिटांत २१ वर्षीय अश्मिताला २१-७, २१-१८ असे पराभूत केलेअसून , उपांत्य फेरीत हैदराबादच्या २६ वर्षीय सिंधूचा थायलंडच्या सहाव्या मानांकित सुपानिडा
कॅटरथाँगशी सामना होणार आहे. सिंगापूरच्या तिसऱ्या मानांकित येओ मिनने आजारपणामुळे माघार घेतल्याने सुपानिडाला पुढे चाल मिळाली. याआधी २०१९च्या राष्ट्रीय स्पर्धेत सिंधूने आसामच्या अश्मिताला नामोहरम केले होते.
आकर्षी कश्यपने मालविका बनसोडची झंझावाती वाटचाल २१-१२, २१-१५ अशी रोखली. तिची उपांत्य फेरीत थायलंडच्या द्वितीय मानांकित बुसानन ओंगबामरुंगफानशी गाठ पडणार आहे. पुरुष एकेरीत एक तास चाललेल्या उपांत्यपूर्व लढतीत तिसऱ्या मानांकित लक्ष्यने आठव्या मानांकित एचएस प्रणॉयवर १४-२१, २१-९, २१-१४ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. लक्ष्यचा उपांत्य फेरीत मलेशियाच्या एनजी झे यंगशी सामना होईल.
पुरुष दुहेरीत भारताच्या द्वितीय मानांकित सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने सिंगापूरच्या ही यंग काय टटेरी आणि लो कीन हीन जोडीचा ३९ मिनिटांत २१-१८, २१-१८ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. याचप्रमाणे इशान भटनागर आणि साईप्रतीक के. या जोडीने फक्त १९ मिनिटांत मलेशियाच्या तिसऱ्या मानांकित ओंग येव सिन व टेवो ई यि जोडीविरुद्ध ७-२१, ७-२१ अशी हार पत्करली. मिश्र दुहेरीत आठव्या मानांकित वेंकट गौरव प्रसाद आणि जुही देवांगन जोडीचा मलेशियाच्या चेन टँग जी आणि पेक येन वेई जोडीसमोर निभाव लागला नाही. वेंकट-जुहीने १०-२१, १३-२१ अशा फरकाने सामना गमावला.