आपल्या राज्याला आणि देशाला कुस्तीची मोठी परंपरा लाभली आहे. देशातल्या अनेक दिग्गज मल्लांनी जगाच्या पाठीवर आपले नाव कोरले आहे. याच कुस्तीने भारताला चक्क ऑलिंपिकमध्येही अनेक पदकं जिंकून दिली आहेत. या खेळात आधी फक्त पुरुषांचा वट असायचा. मात्र, इतर क्षेत्रांसारखं या कुस्तीतही महिलांनी त्यांचा दम दाखवला आहे. देशातील कानाकोपऱ्यातून अनेक मुली कुस्तीकडे वळत आहेत. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. १९६९ सालापासून ‘महाराष्ट्र केसरी‘ ही स्पर्धा सुरू झालीये. यामध्ये फक्त पुरुषांचा सहभाग पाहायला मिळतो. मात्र, आता हे चित्र बदलताना दिसणार आहे. महिलांचा कुस्तीत सहभाग वाढावा यासाठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी सोलापुरात मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा महिलांसाठी महत्त्वाची ठरू शकते.
‘या’ ठिकाणी होणार महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा
आता महाराष्ट्रात पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीसोबतच महिलांच्याही स्पर्धा भरवल्या जाणार असल्याचे दिपाली सय्यद सोलापूर येथे म्हणाल्या. आता पनवेलमध्ये पहिली ‘महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा’ भरवणार असल्याचीही घोषणा अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केली. ही कुस्ती स्पर्धा डीबीएस रेस्टलिंग फाऊंडेशनतर्फे भरवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
“महिला कुस्तीपटूंना व्यासपीठ मिळवण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करत आहोत. पुरुषांसाठी अनेक स्पर्धा आहेत. मात्र, महिलांसाठी नाहीयेत. त्यामुळे त्यांनाही समान संधी मिळण्याची गरज आहे,” असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी महिलांसाठी मॅट आणि माती या दोन्ही प्रकारच्या कुस्तीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचेही सांगितले.
पुरुष मल्लांप्रमाणे महिला मल्लांनीही आपल्या देशाला पदके मिळवून दिली आहेत. हरियाणातील प्रसिद्ध महिला कुस्तीपटू गीता फोगाट आणि तिच्या इतर फोगाट बहिणींच्या आयुष्यावर थेट सिनेमेही बनवण्यात आले आहेत. त्यात ‘दंगल’ या सिनेमाचा समावेश आहे. यामुळे मुलींचा कुस्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असून मोठ्या प्रमाणात मुली या खेळाकडे वळत आहेत. अशात ‘महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा’ महिला मल्लांसाठी मैलाचा दगड ठरू शकते.