औरंगाबाद (प्रतिनिधी)- भारतीय ट्रायथाॅलन महासंघांच्या वतीने चेन्नई येथे या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत औरंगाबादचा दिव्यांग आर्यनमॅन निकेत दलालने सहभाग घेतला. त्याने सुपर स्प्रिंटच्या तिन्ही इव्हेंटमध्ये लक्षवेधी कामगिरी केली. त्याने स्वींमिंगमध्ये ९ मिनिटांत निश्चित २५० मीटरचे अंतर गाठून अव्वल स्थानी धडक मारली. ओपन वाॅटरमध्ये हा इव्हेंट आयोजित करण्यात आला हाेता. त्यानंतर त्याने सायकलिंग करताना ७ किलाेमीटरचे अंतर १४ मिनिट १६ सेकंदांत पूर्ण केले. त्यापाठाेपाठ रनिंगचे १.३ किमीचे अंतर ७ मिनिटे ५५ सेकंदांत गाठले. यासह त्याने साेनेरी यशाचा पल्ला गाठला.
पहिला दिव्यांग आर्यनमॅन निकेत दलाल रविवारी राष्ट्रीय ट्रायथाॅलन स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने दिव्यांगासाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने स्प्रिंटच्या तिन्ही इव्हेंटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. अंध निकेतने आपल्या गटातील 18 स्पर्धकांमधून अव्वल स्थान गाठले.
निकेत दलालने नॅशनल चॅम्पियन हाेण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. याच मेहनतीतून त्याला साेेनेरी यशाचा पल्ला गाठता आला. आगामी काळातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्याला आपला ठसा उमटवण्याची माेठी संधी आहे. प्रचंड क्षमता आणि इच्छाशक्तीच्या बळावर त्याने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.
अशी राहिली कामगिरी – सुपर स्प्रिंट इव्हेंट २५० मीटर स्विमिंग (ओपन वाॅटर) – ९ मिनिट सायकलिंग (७ किलाेमीटर , दाेन लॅप) – १४ मिनिटे १६ सेंकदरनिंग (१.३ किलाेमीटर)-७ मिनिटे ५५ सेकंद