औरंगाबाद – भारतीय तायक्वांदो महासंघ, महाराष्ट्र राज्य तायक्वांदो संघटना व औरंगाबाद हौशी तायक्वांदो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ,राष्ट्रीय तायक्वांदो वरिष्ठ संघ निवड चाचणी स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे २१ ते २६ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आली आहे .अशी माहिती महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रविण बोरसे, कोशाध्यक्ष अविनाश बारगजे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष के.डी. शार्दूल, नीरज बोरसे, लता कलवार, चंद्रशेखर जेऊरकर, अमोल थोरात, आशिष बनकर, प्रविण वाघ यांची उपस्थिती होती.
शिरगावकर म्हणाले की, या स्पर्धेत पोमसे व क्युरेगी प्रकारात जवळपास ३०० खेळाडूंनी नाव निश्चित केले आहे. चाचणीसाठी एकूण ८ कोर्ट तयार करण्यात आले आहेत. तरी स्पर्धेदरम्यान खेळाडू व अधिकाऱ्यांशिवाय कोणत्याही बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. स्पर्धेदरम्यान प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आणि पंचांचे शिबिर घेण्यात येणार आहे. इलेक्ट्रानिक ऑपेटिंग सिस्टिमवर खेळाडू खेळतील. निवडलेला भारतीय संघ एप्रिलमध्ये कोरियातील होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार असून ,त्यापूर्वी संघाचे प्रशिक्षण शिबिर होईल. शिरगावकर पुढे म्हणले की, तायक्वांदो महासंघ खेळाडूंना या वर्षीपासून युनिक आयडी देणार आहे. त्यामुळे एकाच वेळी बारकोडमध्ये खेळाडूंची संपूर्ण माहिती मिळले.
त्याचबरोबर, संघटना येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षकाची नियुक्त करणार आहे. त्यासाठी चर्चा सुरु आहे. जागतीक संघटनेने इराणचे किरॅश बोहरी यांची भारतात समन्वय म्हणून नियुक्तीही केली आहे.