राष्ट्रीय खो-खो स्पर्धा ;कोल्हापूर,गोव्याची विजयी सलामी

मुंबई :- ५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २६ ते ३० डिसेंबर या कलावधीत एमएलबी खेळ परिसर, राईट टाऊन, जबलपूर, मध्य प्रदेश येथे आयोजित केली आहे. २६ डिसेंबर (शनिवार) रोजी स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले. या उद्घाटन समारंभाला प्रल्हाद पटेल (राज्य मंत्री भारत सरकार), राकेश सिंह (खासदार) विवेक तन्खा (खासदार), अजय बिश्नोई (आमदार), भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम. एस. त्यागी, सहसचिव चंद्रजीत जाधव व भारतीय खो-खो महासंघाचे विविध पाधाधिकारी, मध्य प्रदेश खो-खोचे पाधाधिकारी व खोखो प्रेमी उपस्थित होते. तीन मातीची तर एक मॅटचे मैदान या स्पर्धेसाठी तयार केले आहे.
या स्पर्धेत आज कोल्हापूर, गोव्याने विजयी सलामी दिली. या स्पर्धेत पुरुषांमध्ये अंदमान-निकोबार, नागालँड व सिक्किम तर महिलांमध्ये अंदमान-निकोबार, नागालँड, चंडीगढ व आसाम या राज्यांनी कोविड परिषतीतीमुळे स्पर्धेत भाग घेऊ शकत नसल्याचे कळविले असल्याचे समजते. नागालँड संघ न आल्याने महाराष्ट्राच्या २६ डिसेंबर (शनिवार) रोजीच्या दोन्ही संघाच्या लढतीत पुढे चाल देण्यात आली.
२६ डिसेंबर (शनिवार) रोजीच्या झालेल्या महिलांच्या ‘ड’ गटातील साखळी सामन्यात कोल्हापूरने अरुणाचल प्रदेशचा १६-०३ असा एक डाव १३ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात कोल्हापूरच्या ऋतुजा खाडे (२:१० मि. संरक्षण व २ बळी), श्रेया पाटील (२:५० मि. संरक्षण व ३ बळी) यांनी चमकदार कामगिरीची नोंद केली. मात्र अरुणाचलच्या कोणत्याही खेळाडूला विशेष कामगिरी करता आली नाही.
पुरुषांच्या ‘ह’ गटातील साखळी सामन्यात गोव्याने जम्मू-काश्मीरवर १८-१७ असा १:३० मि. राखून एक गुणाने विजय संपादन केला. मध्यातराला गोव्याने १२-०६ अशी ६ गुणांची मोठी आघाडी घेतली होती मात्र उत्तरार्धात जम्मू-काश्मीरने जोरदार लढत दिली. मध्यंतराच्या ६ गुणांच्या आघाडीनेच गोव्याचा विजय सुकर झाला. या सामन्यात गोव्याचा कर्णधार सॅवियो नोरोन्हा (३:१० मि. संरक्षण व ३ गडी), प्रवेश वेळीप (१:१०, १:२० मि. संरक्षण व ४ गडी) यांनी अष्टपैलू खेळ करत सहज विजय सांपदन केला. तर जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंना विशेष चमक दाखवता आली नाही.
Comments are closed.