नागपूरच्या पोट्टीचा पराक्रम ;ऑलिम्पिक पदकविजेत्या सायनाला केलं पराभूत!
सायना नेहवालचा इंडिया ओपन २०२२ स्पर्धेतील प्रवास लवकर संपुष्टात

ऑलिम्पिक पदकविजेती आणि भरताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा इंडिया ओपन २०२२ स्पर्धेतील प्रवास लवकर संपुष्टात आला आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत नागपूरची २० वर्षीय बॅडमिंटनपटू मालविका बनसोडने सानियाला २१-१७, २१-१९ असे हरवले. हा सामना ३४ मिनिटे सुरू होता. लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदक जिंकले होते. दिग्गज खेळाडूला पराभूत केल्यानंतर मालविकाचे सोशल मीडियावरून कौतुक होत आहे.
सायना नेहवालने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेद्वारे प्रदीर्घ कालावधीनंतर बॅडमिंटन कोर्टवर प्रवेश केला. मात्र नवीन वर्षाची सुरुवात तिच्यासाठी चांगली होऊ शकली नाही. सायनाला पहिल्या फेरीत झेक प्रजासत्ताकची तिची प्रतिस्पर्धी तेरेझा स्वाबिकोवा हिला दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला. पण तिला पुढचा प्रवास चालू ठेवता आला नाही.
भारताची आणखी एक स्टार शटलर पीव्ही सिंधूचा प्रवास स्पर्धेत यशस्वीपणे सुरू आहे. तिने इरा शर्माविरुद्धचा दुसरा फेरीचा सामना २१-१०, २१-१० असा जिंकला. याशिवाय अश्मिता चलिहा हिनेही दुसऱ्या फेरीचा सामना जिंकला आहे. आता तिसऱ्या फेरीत त्याचा सामना पीव्ही सिंधूशी होणार आहे.
Comments are closed.