महाराष्ट्र खो-खो संघांची गोल्डन पंचसाठी कसून तयारी

पुणे( प्रतिनिधी) गोल्डन चौकार मारणारे महाराष्ट्राचे महिला आणि पुरुष खोखो संघ आता पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये अजिंक्य होण्यासाठी सज्ज झाले आहेत. दर्जेदार आणि सर्वोत्तम कामगिरी मध्ये सातत्य ठेवत महाराष्ट्राचे संघ गोल्डन पंच मारण्यासाठी कसून सराव करत आहेत. मुख्य प्रशिक्षक प्रज्ञा पाटील आणि प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे दोन्ही संघ बालेवाडी मध्ये सराव करत आहेत.
येत्या 30 जानेवारीपासून मध्य प्रदेशात पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स ला सुरुवात होणार आहे. याच स्पर्धेच्या तयारीसाठी बालेवाडी मध्ये सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले. कबड्डी पाठोपाठ खो खो संघाच्या ही शिबिराला सुरुवात झाली आहे.
सलग चार सत्रापासून महाराष्ट्राचे दोन्ही खो-खो संघ किताबाचे मानकरी ठरले आहेत. त्यामुळे आपले जेतेपदावरचे वर्चस्व कायम ठेवत पुन्हा एकदा अजिंक्य होण्याचा मानस खेळाडूंनी व्यक्त केला आहे.
अचूक खेळी; सर्वोत्तम तंत्रावर भर
महाराष्ट्राचे महिला आणि पुरुष खो-खो संघ सध्या बालेवाडीत मॅटवर स्पर्धेची तयारी करत आहेत. या संघाच्या प्रशिक्षणासाठी मुख्य प्रशिक्षकांसह दोन सहाय्यक प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनातून दोन्ही संघाचे खेळाडू अचूक खेळी आणि सर्वोत्तम तंत्रावर अधिक भर देत आहेत. याच तंत्रशुद्ध प्रशिक्षणातून त्यांना सलग पाचव्यांदा सुवर्णपदकाचा मानकरी होण्याची संधी आहे.
महिला संघासमोर ओडिशाचे आव्हान
महाराष्ट्राच्या महिला संघाला सलग चार सतरा पासून आपले वर्चस्व अबाधित ठेवता आले. मात्र यंदा महिला संघाला सावधगिरी करत आपला बहुमान राखून ठेवण्याची गरज आहे. खो-खोमध्ये सध्या ओडिशा महिला संघाची कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे ओडिशा संघाच्या धक्कादायक निकालाचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी महिला संघाला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. ओडिशा संघाची नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय ठरली.
प्रीती, निशा, वृषालीची कामगिरी ठरणार लक्षवेधी
महाराष्ट्र संघाकडून राष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या सोलापूरची प्रीती काळे आणि नाशिकच्या निशा वैजल, वृषाली भोई यांची कामगिरी लक्षवेधी ठरेल. त्यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे त्यांना आता आपल्या दर्जेदार कामगिरीमध्ये सातत्य ठेवत संघाला किताब मिळवून देण्याची मोठी संधी आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडू जान्हवी पेठेच्या सहभागामुळे महाराष्ट्र महिला संघ अधिक मजबूत मानला जात आहे.
Comments are closed.