पुणे (प्रतिनिधी): कोरिया संघाने आज आकर्षक विजयाची नोंद करत एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दृष्टिने भक्कम पाऊल टाकले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या सी गटातील सामन्यात कोरियाने म्यानमारचा २-० गोलने पराभव केला.
ली जेऊम हिने उत्तराधार्तील चौथ्या मिनिटाला गोल करून कोरियाचे खाते उघडले. त्यानंतर सामना संपण्यास सात मिनिटांचा अवधी असताना जी सो यून हिने दुसरा गोल केला. कोरियासाठी हा विजय महत्वाचा ठरला. आता या गटातील आजच होणाऱ्या सामन्यात जपानने व्हिएतनामवर विजय मिळविल्यास कोरियाचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल.
प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखण्यासाठी कोरियाला फारसे कष्ट पडले नाहीत. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून त्यांनी आपल्या खेळाची चुणूक दाखविण्यास सुरवात केली. त्यांच्या चो सो ह्यून हिने हेडिंग करत गोल करण्याची संधी साधली. पण, तिचे हेडर गोलपोस्टच्या बाजूने बाहेर केले. म्यानमारच्या बचावपटूंना आज सुरेख कामगिरी करत कोलिन बेल यांच्या कोरियन खेळाडूंना चांगलेच सतावले. त्यामुळे बेल यांना ठोस निर्णय घ्यावे लागले.
कोरियाची अनेक आक्रमणे म्यानमारच्या बचावपटूंनी फोल ठरवली. त्यानंतर अचूक फटक्यांच्या अभावी त्यांचे गोल करण्याचे इतर अनेक प्रयत्नही व्यर्थ ठरले. विश्रांतीला अकरा मिनिटे बाकी असताना बेल यांनी जी हिला सोन वा येआॅन हिच्या जागी मैदानात उतरवले आणि त्याचे फायदे त्यांना मिळू लागले. मध्यरक्षकाच्या भूमिकेत खेळणाऱ्या जी हिच्या मैदानावरील सहभागाने कोरियाच्या आक्रमणांना वेगळीच धार आली. मैदानात उतरल्यावर सातव्याच मिनिटाला या चेल्सीच्या व्यावसायिक खेळाडूने लांब पल्ल्यावरून मारलेली किक बाहेर गेली. पाठोपाठ लिम सेऑन जू हिची किकही वाईड ठरली. पहिल्या सत्रातील भरपाई वेळेतही कोरियन आक्रमकांना निराश व्हावे लागले. चू ह्यो जू हिची किक म्यानमारची गोलरक्षक मे झिन न्वे हिने झेपावत अडवली.
उत्तराधार्तील चौथ्याच मिनिटाला कोरियाला अखेर जाळीचा वेध घेण्यात यश आले. जँग हिचा हवेतून आलेला पास चो सो ह्यून हिने पुन्हा एकदा हेडर केला. तो चेंडू ली जेऊम हिने आपल्या मांडीवरून क्लिअर केला आणि चेंडूला थेट जाळीची दिशा दिली. जँग हिने मारलेली किक म्यानमारची गोलरक्षक न्वे हिच्या डोक्यावरून बाहेर केले. जी आणि ली यांच्या थेट आलेल्या किक न्वे हिने सुरेख अडवल्या. सामना संपण्यास सात मिनिटे असताना कोरियाने दुसरा गोल केला. त्यावेळी किम ह्ये री हिच्याकडून हवेतून आलेल्या पासवर सुरेख हेडर करत जी हिने हा गोल केला. त्या वेळी तुन खिन मो हिच्या अंगाला स्पर्श करून चेंडूने गोलपोस्टची रेषा पार केली.