खेलो इंडिया युथ गेम्स2021; हरियाणा नंबर वन महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

हरियानात खेल अकादमी स्थापन करणार – मनोहर लाल

पंचकुला(प्रतिनिधी): हरियाना ही खेळाची राजधानी आहे. ती कायम तशीच राहावी, यासाठी हिस्सार, कर्नाल आदी ठिकाणी क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. एवढेच नव्हे तर देशातील प्रतिभावान खेळाडूंसाठी पंचकुला येथे हरियाना खेल अकादमी सुरू केली जाईल. त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक आणि इतर सुविधा दिल्या जातील. ही सर्वच राज्यांतील खेळाडूंसाठी मोठी उपलब्धी असेल, अशी घोषणा हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी केली.

खेलो इंडिया यूथ गेम्सचा समारोप राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्या प्रमुख उपस्थित झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंग ठाकूर, हरियानाचे क्रीडा मंत्री संदीपसिंह आदी उपस्थित होते. यावेळी प्रथम क्रमांकावर असलेल्या हरियाना, दुसऱ्या स्थानावरील महाराष्ट्र व तिसऱ्या स्थानावरील कर्नाटकला समारंभपूर्वक चषक प्रदान करण्यात आला. क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे, मुख्य व्यवस्थापक अरूण पाटील यांच्यासह खेळाडूंनी हा मानाचा चषक स्वीकारला.

हरियाणा नंबर वन

मुख्यमंत्री मनोहरलाल म्हणाले, या स्पर्धेचे आयोजन करताना अनेक अडचणी आल्या. कोविडमुळे तीन वेळा स्पर्धा पुढे ढकलावी लागली. हरियाना राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले, याचा आनंद आहे. हरियानाच्या खेळाडूंनी नेहमीच देशाचे प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेतही त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्राने चांगली फाईट दिली. नेहमीच या दोन राज्यांमध्ये टशन होत असते. इतर राज्यांनीही आपले खेळातील कसब दाखवले पाहिजे. हरियानाने खेळाडूंसाठी वेगळे बजेट सरकारने केले आहे. १०० कोटी रूपयांची त्यासाठी तरतूद केली आहे. लहानपणापासून खेळाडू घडावेत, यासाठी ११०० स्पोर्टस नर्सरी सुरू केल्या आहेत. त्यातील काही सुरू व्हायच्या आहेत.

संयुक्ता काळे, अपेक्षा फर्नांडीसचे कौतुक

क्रीडा मंत्री ठाकूर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा होत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वच राज्यांतील खेळाडू स्पर्धेत कौशल्य दाखवित आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही खेळाडू चमक दाखवित आहेत. गरीब घरातील खेळाडूंसाठी ही मोठी संधी आहे. या स्पर्धेत एकूण १२ रेकॉर्ड झाले. त्यातील ११ हरियानाच्या मुलींनी केली. महाराष्ट्राच्या संयुक्ता काळे, जलतरणपटू अपेक्षा फर्नांडीस यांनी पाच-पाच पदके पटकावून विक्रम केला. भविष्यात हेच खेळाडू देशाचे नाव मोठे करतील.

महाराष्ट्राचे गुणगाण

खेलो इंडिया स्पर्धा देशातील सर्व प्रतिभावान खेळाडूंसाठी व्यासपीठ आहे. मी दररोज या स्पर्धेतील पदतालिकेवर लक्ष ठेवून होतो. महाराष्ट्र आणि हरियाना यांच्यात फाईट होती. कधी हरियाना पुढे तर कधी महाराष्ट्र, अशी स्थिती होत होती. महाराष्ट्राने मागील दोन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, या स्पर्धेत हरियानाने बाजी मारली. दोन्ही राज्यांचा आदर्श इतर राज्यांनी घ्यावा, सरकार खेळ आणि खेळाडूंसाठी नेहमीच सकारात्मक आहे, अशा शब्दांत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी महाराष्ट्राचे गुणगाण केले.

शेवटच्या दिवशी तीन सुवर्ण, तीन रौप्य, एक कांस्य पदक
शेवटच्या दिवशी महाराष्ट्राने खो-खोमध्ये मुला-मुलींच्या संघाने सुवर्णपदके पटकावली. बॉक्सिंगमध्ये एक सुवर्ण आले. तर तीन रौप्य पदके मिळाली. एक कांस्य पदक टेबल टेनिसमध्ये मिळाले. अशी रितीने शेवटच्या दिवशी एकूण सात पदके आली.

महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणा-या राज्याच्या चमूचे अभिनंदन- क्रीडा मंत्री सुनील केदार

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील सहभागी चमूने महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखली . खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये ४५ सुवर्ण पदकांसह १२५ पदकांची कमाई करणाऱ्या महाराष्ट्राच्या चमूचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी अभिनंदन केले.

पंचकुला (हरयाणा) येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये अंतिम पदक तालिकेत ४५ सुवर्ण ४० रौप्य आणि ४० कांस्य पदकांची कमाई केली आहे. या यशासाठी स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि व्यवस्थापक आदींचे तसेच खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांचेही श्री केदार यांनी अभिनंदन करुन याचमूचे राज्यात विशेष कौतुक सोहळा आयोजित करून योग्य तो सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

You might also like

Comments are closed.