पणजी (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या पुरुष संघाने शनिवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली, तर महिला संघ बलाढ्य हिमाचल प्रदेशकडून पराभूत झाला. कॅम्बल मल्टिपर्पज स्टेडियमवर सुरू झालेल्या कबड्डी स्पर्धेतील पहिल्या साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने पंजाबचा प्रतिकार ३९-३२ असा मोडून काढला.
आक्रमक सुरुवात करीत महाराष्ट्राने पूर्वार्धात दोन लोण देत २२-१० अशी आघाडी घेऊन विजयाचा पाया रचला होता. पण उत्तरार्धात मात्र पंजाबने महाराष्ट्राला पुरते जेरीस आणले होते. शेवटचे पाच मिनिटे पुकारले, तेव्हा ३५-३० अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. शेवटी अनुभवाच्या जोरावर महाराष्ट्राने बाजी मारली.
आकाश शिंदे, आदित्य शिंदे यांच्या आक्रमक चढाया आणि त्यांना मयूर कदम, अरकम शेख यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय मिळवता आला.
महाराष्ट्राच्या महिलांनी मात्र घोर निराशा केली. हिमाचल प्रदेशने महाराष्ट्राला ४४-२३ असे सहज हरवले. मध्यांतराला ११-२५ असे पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राला उत्तरार्धातदेखील आपला खेळ उंचावता आला नाही. महाराष्ट्राकडून हरजित कौरने एकाकी लढत दिली. महाराष्ट्राच्या गटात हरयाणा व राजस्थान हे आणखी दोन संघ असून या दोन्ही लढती त्यांनी जिंकाल्या तरच त्यांना बाद फेरी गाठता येईल.
अ-गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राचा पुरुष गटातील पुढील सामना रविवारी तामिळनाडूशी आहे, तर ब-गटात असलेला महिला संघ राजस्थानशी भिडणार आहे.