मोहाली –भारत आणि श्रीलंकेदरम्यान मोहाली येथे सुरु असणाऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने ८ गड्यांच्या मोबदल्यात ५७४ धावा करुन डाव घोषित केली. या डावामध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने त्याच्या करियरमधील सर्वोत्तम कसोटी खेळी केली. जडेजाने २२८ चेंडूंमध्ये नाबाद १७५ धावा केल्या. या डावखुऱ्या फलंदाजाने २२८ चेंडूंमध्ये १७ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १७५ धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवशी जडेजाच्या फलंदाजीचीच चर्चेत राहिली. मात्र त्याचबरोबरच एक गोष्ट भारतीय चाहत्यांना खुपली ती म्हणजे त्याचं द्विशतक झालं नाही.
जडेजा ज्या पद्धतीने खेळत होता ते पाहता तो आज द्विशतक साजरं करेल असं वाटतं होतं. मात्र तसं झालं नाही. अचानक भारताने डाव घोषित केल्याने जडेजाचं द्विशतकं होऊ द्यायला हवं होतं असं मत अनेकांनी व्यक्त केलंय. जडेजासोबत फलंदाजीसाठी आलेल्या रविचंद्रन अश्विनने ८२ चेंडूंमध्ये ६२ धावांची खेळी केली. तर मोहम्मद शमी २० धावा बनवून नाबाद राहिला. शमीने सुद्धा जम बसवल्याने किमान जडेजाच्या द्विशतकापर्यंत वाट पाहता आली असती असं अनेक क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर म्हटलंय.
अनेकांना २००४ सालच्या एका सामन्याची आठवणही झालीय. यावेळी राहुल द्रविडच भारतीय संघाचा कर्णधार होता. भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर असताना मुल्तानच्या मैदानावर सचिन तेंडुलकर १९४ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी द्रविडने अचानक डाव घोषित करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हा द्रविड कर्णधार होता आणि आज जडेजाच्या बाबतीत असाच प्रकार घडला तेव्हा द्रविड प्रशिक्षक आहे.
जडेजा द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना अचानक कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित केला. त्यानंतर चहापानासाठी विश्रांती घेण्यात आली. रोहितने डाव घोषित करण्याचा वेळ चुकवला अशी तक्रार अनेकांनी केलीय. जडेजा अजून काही काळ खेळला असता तर त्याने सहज द्विशतक साजरं केलं असतं. मात्र भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहितने जाडेजाचं द्विशतक होण्यासाठी २५ धावा शिल्लक असतानाच डाव घोषित केला. याबद्दल अनेक क्रिकेट चाहत्यांनी उघडपणे राहुल द्रविड आणि रोहित शर्मावर टीका केलीय. त्यांच्या या निर्णयाबद्दल सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जातेय.