गोवा इंडियन सुपर लीग २०२१-२२ स्पर्धेत नॉर्थ ईस्ट युनायटेडवर ३-२ असा निसटता विजय मिळवत एटीके मोहन बागानने सलग सामन्यांतील अपराजित राहण्याची मालिका खंडित केली. ७ सामन्यांतून तिसऱ्या विजयासह त्यांनी गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली.
पीजेएन स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या लढतीत मध्यंतराला १-१ अशी बरोबरी होती. त्यामुळे विजयाचे पारडे कुणाकडे झुकणार, हे सांगणे कठीण होते. उत्तरार्धात तीन गोलांची भर पडली. त्यातील दोन गोल मोहन बागानने केले. तसेच सामना आपल्या बाजूने फिरवला.
मध्यंतरापूर्वीच्या बरोबरीच्या गोलने मोहन बागानच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला. त्याचा प्रत्यय दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला आला. सुभाशिष बोसच्या पासवर ह्युगो बॉमॉसने ५३व्या मिनिटाला एटीकेला २-१ असे आघाडीवर नेले. त्याने ७६व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल केला. हा गोल निर्णायक ठरला. सामना संपायला १३ मिनिटे शिल्लक असताना मशूर शरीफने प्रतिस्पर्ध्यांची आघाडी कमी केली. मात्र, नॉर्थ ईस्टला पराभव टाळण्यात अपयश आले.
तत्पूर्वी, मध्यंतराला उभय संघांमध्ये १-१ अशी बरोबरी पाहायला मिळाली. पेनल्टी कॉर्नरद्वारे दुसऱ्याच मिनिटाला सुहेर वेदाक्केपीदिकाने नॉर्थ ईस्टचे खाते उघडले. त्यानंतर ४३ मिनिटे त्यांनी आघाडी राखली. मात्र, मध्यंतरापूर्वी एक मिनिट आधी लिस्टन कोलॅकोने मोहन बागानला बरोबरीत आणले. पहिला गोल करण्याचा मान सुहेरने मिळवला. मॅथियास कॉरियरच्या पासवर चेंडूवर ताबा घेत नॉर्थ ईस्टच्या सुहेरने गोलपोस्टच्या दिशेने कूच केली. एकटाच चाल करणाऱ्या सुहेरला मोहन बागानच्या गोलकीपरने डाव्या बाजूने डाइव्ह मारताना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुहेरचा फटका अचूक गोलजाळ्यात गेला.
मधल्या कालावधीत नॉर्थ ईस्टने आघाडी वाढवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच मोहन बागानने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. रॉय क्रिष्नाला २२व्या मिनिटाला गोल करण्याची संधी होती. मात्र, त्याचा फटका थेट गोलीच्या हातात गेला. त्यानंतर ४०व्या मिनिटाला कोलॅकोचा अचूक फटका खास कॅमाराने अडवला. नॉर्थ ईस्ट युनायटेड आघाडी राखणार, असे वाटत असतानाच रॉय क्रिष्नाच्या पासवर मोहन बागानचे नशीब उघडले. कोलॅकोने संधीचे सोने करताना एटीकेला बरोबरी गाठून दिली. तसेच प्रतिस्पर्ध्यांचे वर्चस्व कमी केले.
मोहन बागानने अप्रतिम खेळ करताना मागील चार सामन्यांतील पराभवांची मालिका खंडित केली. हा त्यांचा तिसरा विजय आहे. या विजयानंतर ७ सामन्यांतून त्यांचे ११ गुण झालेत. अव्वल स्थानी असलेल्या मुंबई सिटी एफसीसह (१५ गुण) जमशेदपूर एफसी (१२ गुण), हैदराबाद एफसी (११ गुण) आणि चेन्नईयन एफसी (११ गुण) यांच्यानंतर गुणतालिकेत ‘डबल फिगर’ गाठणारा तो पाचवा संघ आहे.
मागील लढतीत एससी ईस्ट बंगालवर २-० अशी मात करताना नॉर्थ ईस्ट युनायटेड क्लब विजयीपथावर परतला होता. मंगळवारी एटीकेविरुद्धही त्यांनी आश्वासक सुरुवात केली तरी उत्तरार्धातील ढिसाळ खेळाने ते बॅकफुटवर फेकले गेले. त्यांचा ८ सामन्यांतील हा चौथा पराभव आहे.
निकाल : एटीके मोहन बागान – ३(लिस्टन कोलॅको ४५+२व्या मिनिटाला, ह्युगो बॉमॉस-५२व्या आणि ७६व्या मिनिटाला) विजयी वि. नॉर्थ ईस्ट युनायटेड २(सुहेर-दुसऱ्या मिनिटाला, मशूर शरीफ-८७व्या मिनिटाला)