पणजी (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या खेळाडूंनी डायव्हिंगमध्ये पदकांची मालिका कायम राखताना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुधवारी एक सुवर्ण व एक रौप्य अशी तीन पदके जिंकली. प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये २० वर्षाची खेळाडू ईशा वाघमोडेने सुवर्णपदक जिंकले तर ऋतिका श्रीरामने रौप्यपदक पटकावले. याचप्रमाणे महिलांच्या चार बाय २०० मीटर्स फ्री स्टाईल रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी रौप्यपदक जिंकून दिवसाची यशस्वी सांगता केली. जलतरण क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने एकूण एक सुवर्ण आणि दोन रौप्य अशी दोन पदके पटकावली.
ईशाने १८२.७५ गुण नोंदवले तर ऋतिकाला १७७.३० गुण मिळाले. काल ऋतिकाने स्प्रिंग बोर्ड प्रकारात रौप्यपदक मिळविले होते. ती सोलापूर येथील खेळाडू असून मनीष भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. वयाच्या नवव्या वर्षापासूनच ती या क्रीडा प्रकारात आहे.
गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील दोन कांस्यपदके जिंकली होती. ती मुंबईत रेल्वे खात्यामध्ये खेळाडू कार्यरत आहे. आजपर्यंत तिने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भरघोस पदके जिंकली आहेत.
प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये राघवी रामानुजन, अवंतिका चव्हाण, धृती अहिरवाल व आदिती हेगडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने ही शर्यत ९ मिनिटे, ३.५२ सेकंदांत पार केली. कर्नाटक संघाने हे अंतर ८ मिनिटे, ४९.७४ सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले.
आता ध्येय आंतरराष्ट्रीय पदकाचे -ईशा
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. आता मला आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके जिंकायची आहेत. आशियाई वयोगट स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, जागतिक क्रीडा स्पर्धा अशा स्पर्धांमध्ये टप्प्याटप्प्याने मला झेप घ्यायची आहे. त्या दृष्टीने आवश्यक तो त्याग करायची आणि कष्ट करण्याची माझी तयारी आहे, असे ईशा वाघमोडेने सांगितले.
वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्राची विजयी घोडदौड
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वॉटर पोलो मध्ये पुरुषांच्या गटात सलग दुसरा विजय नोंदविताना आज कर्नाटक संघाचा १३-२ असा धुव्वा उडविला. काल महाराष्ट्राने मणिपूरला २८-३ अशी धूळ चारली होती.