म्युलहाइम -काल झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये माजी विजेत्या सिंधूने बिगरमानांकित झांगला झुंज दिली. मात्र, मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात तिला अपयश आले आहे.
ऑलिम्पिक पदकविजेत्या भारतीय बॅडिमटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांचे जर्मन खुल्या स्पर्धेतील (सुपर ३०० दर्जा) आव्हान गुरुवारी संपुष्टात आले. जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या किदाम्बी श्रीकांतने मात्र विजयी घोडदौड कायम राखली.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत सातव्या मानांकित सिंधूला चीनच्या झांग यी मानने १४-२१, २१-१५, १४-२१ असा पराभवाचा धक्का दिला. माजी विजेत्या सिंधूने बिगरमानांकित झांगला झुंज दिली. मात्र, मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात तिला अपयश आले. दुसरीकडे थायलंडच्या रॅटचानोक इंटानोनने एकतर्फी सामन्यात सायनाला २१-१०, २१-१५ असे नमवले.
पुरुष दुहेरीत भारताच्या इशान भटनागर आणि साईप्रतीक के. जोडीने या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. इशान-साईप्रतीक जोडीने ३० मिनिटांत इंग्लंडच्या कॉलम हेिमग आणि स्टीव्हन स्टॅलवूड जोडीला २१-१५, २१-१६ असे नमवले. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीचा जपानच्या नामी मात्सुयामा आणि शिहारू शिडा जोडीकडून १३-२१, १३-२१ पराभव झाला.
पुरुषांमध्ये आठव्या मानांकित श्रीकांतने कामगिरीत सातत्य राखताना चीनच्या लू गुआंग झूवर २१-१६, २१-२३, २१-१८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. तिसऱ्या फेरीत श्रीकांतपुढे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि अव्वल मानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सेलसेनचे आव्हान असेल. अॅक्सेलसेनने दुसऱ्या फेरीत फ्रान्सच्या तोमा पोपोव्हला २१-१७, २१-१० असे सहज पराभूत केले. त्याने पहिल्या फेरीचा सामनाही सरळ गेममध्ये जिंकला होता. त्यामुळे श्रीकांतला आगेकूच करणे अवघड जाऊ शकेल.