सिंधूचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात

दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या भारताच्या अग्रमानांकित पी. व्ही. सिंधूचे इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. मात्र जागतिक कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरीची आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. जागतिक क्रमवारीत ३३व्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या सुपानिडा कॅटेथाँगकडून सिंधूने ५९ मिनिटे रंगलेल्या लढतीत १४-२१, २१-१३, १०-२१ अशी हार पत्करली. त्यामुळे २०१९च्या विश्वविजेत्या सिंधूचा जेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला आहे.

आकर्षी कश्यपची वाटचाल उपांत्य फेरीत खंडित झाली़  बुसानन ओंगबामरंगफानने आकर्षीला २६-२४, २१-९ असे नामोहरम केल़े जागतिक क्रमवारीत १७व्या क्रमांकावरील मलेशियाच्या एनजी झे यंगला १९-२१, २१-१६, २१-१२ असे नामोहरम केले.  सात्त्विक-चिराग जोडीने फ्रान्सच्या फॅबियन डेलरूई व विल्यम व्हिलेगर जोडीला २१-१०, २१-१८ असे नमवले.

माघारसत्र कायम

करोनाची लागण आणि दुखापत या कारणास्तव स्पर्धेतील माघारसत्र शनिवारीसुद्धा कायम राहिले. मिश्र दुहेरीत रशियाच्या रोडिअन अलिमोव्हच्या करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे द्वितीय मानांकित रोडिअन आणि अलिना डॅव्हलेटोव्हा जोडीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. करोना चाचणी नकारात्मक आली असली तरी कॅनडाच्या ब्रायन यंगने घसा खवखवत असल्याने उपांत्य लढतीतून माघार घेतली. त्यामुळे विश्वविजेत्या लो कीन येवने पुरुष एकेरी अंतिम फेरी गाठली.

You might also like

Comments are closed.