बंगळूरु -भारताचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना श्रेयस अय्यरने दडपण झुगारत ९२ धावांची झुंजार खेळी साकारली. त्यामुळेच भारताला शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या प्रकाशझोतातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी २५२ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर श्रीलंकेची पहिल्या डावात ३० षटकांत ६ बाद ८६ अशी तारांबळ उडाली.
दिवसाचा खेळ संपला तेव्हा निरोशन डिक्वेला १३, तर लसिथ एम्बुलडेनिया शून्यावर खेळत होता. श्रीलंका अद्यापही पहिल्या डावात १६६ धावांनी पिछाडीवर असून जसप्रीत बुमरा (३/१५) आणि मोहम्मद शमी (२/१८) या वेगवान जोडीने श्रीलंकेला हैराण केले. तत्पूर्वी, श्रेयसने ९८ चेंडूंत १० चौकार आणि ४ षटकारांसह ९२ धावा काढल्या. कारकीर्दीतील दुसऱ्या शतकाकडे कूच करीत असताना प्रवीण जयविक्रमाच्या गोलंदाजीवर पुढे सरसावून खेळण्याच्या प्रयत्नात तो यष्टिचीत झाला. श्रेयसने पाचव्या गडय़ासाठी ऋषभ पंतच्या साथीने ४०, सातव्या गडय़ासाठी रविचंद्रन अश्विनच्या साथीने ३५, आठव्या गडय़ासाठी अक्षर पटेलच्या साथीने ३२ आणि १०व्या गडय़ासाठी जसप्रीत बुमराच्या साथीने २३ धावांच्या भागीदाऱ्या केल्या. पंतने पहिल्या कसोटीप्रमाणेच दुसऱ्या क्रमांकाचे योगदान देताना २६ चेंडूंत ३९ धावा केल्या.
या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकताच अपेक्षेप्रमाणेच प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर मयांक अगरवाल (४) धावचीत झाला. मग रोहित शर्मानेही (१५) निराशा केली. हनुमा विहारी (३१) आणि विराट कोहली (२३) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ४७ धावांची भागीदारी करून डाव सावरला. पण विराटला पुन्हा शतकी खेळी साकारण्यात अपयश आले. विहारी, कोहली बाद होताच श्रेयसने सामन्याची सूत्रे स्वीकारली. श्रीलंकेकडून एम्बुलडेनिया आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
भारत (पहिला डाव) : ५९.१ षटकांत सर्व बाद २५१ (श्रेयस अय्यर ९२, ऋषभ पंत ३९, हनुमा विहारी ३१; लसिथ एम्बुलडेनिया ३/९४, प्रवीण जयविक्रमा ३/८१)
श्रीलंका (पहिला डाव) : ३० षटकांत ६ बाद ८६ (अँजेलो मॅथ्यूज ४३, निरोशन डिक्वेला १३*; जसप्रीत बुमरा ३/१५, मोहम्मद शमी २/१८)