पोचेफस्ट्रोम – ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमधील भारतीय पुरुष संघ आपल्या अभियानाला मंगळवारपासून प्रारंभ करणार असून सलामीच्या लढतीत त्यांच्यापुढे फ्रान्सचे आव्हान असेल.
मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेतील पोचेफस्ट्रोम येथे ८ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत फ्रान्स आणि यजमान आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळणार आहे. त्यानंतर २६, २७ फेब्रुवारीला भारताची स्पेनशी गाठ पडणार आहे. जागतिक क्रमवारीत भारतीय संघ सध्या पाचव्या, तर फ्रान्स १२व्या स्थानावर आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सलामीच्या लढतीत भारताचे पारडे जड मानले जात आहे. उभय संघांमधील अखेरचा सामना २०१५मध्ये झाला आणि यात भारताने ३-२ असा निसटता विजय मिळवला होता.
भारतीय संघ यंदाच्या वर्षात राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांत खेळणार असून त्यापूर्वी आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रो लीग स्पर्धेचा फायदा होईल, असे उपकर्णधार हरमनप्रीत सिंगला वाटते. ‘‘आम्हाला हंगामाच्या सुरुवातीलाच दोन उत्तम संघांविरुद्ध सामने खेळण्याची संधी लाभत आहे. या सामन्यांचा आम्हाला आगामी काळातील मोठ्या स्पर्धांच्या तयारीसाठी फायदा होईल. आम्ही फ्रान्सविरुद्धच्या सलामीच्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. आम्ही या स्पर्धेची विजयी सुरुवात करू अशी मला आशा आहे,’’ असे हरमनप्रीत म्हणाला.
वेळ : रात्री ९.३० वा.
सामना कुठे पहायचा ?
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २