संभाजीनगर (प्रतिनिधी): ‘‘आरामासाठी थांबू नका. आयुष्य आव्हान स्विकारण्यासाठी आहे. आयुष्यात कधी मोठे, कधी छोटे व्हावे, हे समजायला हवे. इगोमध्ये अडकून पडू नका.’’ असा सल्ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी दिला. आकात सामर्थ्य प्रिमिअर क्रिकेट लीगचे उद्घाटन रविवारी (ता. १९) त्यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी श्री. नांगरे पाटील बोलत होते.
शिवजयंतीनिमित्त एमजीएम क्रिकेट मैदानावर सामर्थ्यच्या क्रिकेट लीगला सुरवात झाली. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सलामी देत स्वागत केले. यावेळी झांज पथकातील मुलांमुलींनी सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधले. श्री. नांगरे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी एमजीएम रुग्नालयाचे डॉ. प्रविण सुर्यवंशी, एमसीएचे नवनियुक्त सदस्य सचिन मुळे, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव आशिष गाडेकर, सामर्थ्यचे अध्यक्ष गिरीश उबाळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
श्री. नांगरे पाटील म्हणाले, ‘‘सामर्थ्य हा शिस्तबद्ध ग्रुप आहे. एकमेकांना बरोबर घेण्याची वृत्ती आहे. छत्रपतींनीही सवंगड्यांना घेऊन स्वराज्य घडवले. कुठला माणूस कुठं वापरायचा, याची कसब राजेंना होते. छत्रपतींनी सुराज्य निर्माण केले. छत्रपतींचे अष्टप्रधान वेगवेगळ्या क्षेत्रातील होते. लष्करासोबत नागरी प्रशासन तितकेच महत्वाचे आहे. फक्त लष्करी प्रशासनाने काय होऊ शकते, हे पाकिस्तानकडे पाहिल्यावर लक्षात येते. कमी खर्चात युद्ध कसे जिंकावे, हे शिवरायांनी गनिमी काव्यातून दाखवून दिले आहे. हे त्याकाळचे आर्थिक नियोजन होते.’’
यावेळी रणजीत मुळे, सुनिल किर्दक, समीर मुळे, अजित मुळे, कुणाल आकात, रणजीत चव्हाण, सतिश आजबे, वैभव जाधव, देवेश पाथ्रीकर, सचिन घायाळ, सचिन पाटील, संग्राम पटारे, वैभव धोंडे, गणेश जाधव, बाळासाहेब पवार, गोरख मिथे या संघमालकांचा सत्कार श्री. नांगरे पाटील यांच्याहस्ते झाला. प्रस्ताविक रोहीत सुर्यवंशी यांनी केले. सुत्रसंचालन अभिजीत सोनवणे यांनी केले. राम झिनझान यांनी आभार मानले.
ते विचार माझे नाहीत’
माझी ओळख करुन देताना इतर कुणाचे तरी, विचार माझे असल्याचे सांगण्यात आले. माझे बरेच विचार हे वेदातून आले आहेत. मघाशी सांगितलेले ते विचार माझे नाहीत. सोशल मीडियावर असे इतरांचे विचार माझ्या नावाने खपवले जातात. असे विश्वास नांगरे पाटील यांनी म्हणताच, उपस्थितांनी हसत दाद दिली.