औरंगाबाद(प्रतिनिधी): एरोबिक जिम्नॅस्टिक्सच्या आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत महाराष्ट्राचे जिम्नॅस्टिकस असोसिएशनचे सचिव तथा एशियन जिम्नॅस्टिक्स युनियन वर एरोबिक जिम्नॅस्टिक्सचे तांत्रिक समिती सदस्य म्हणून काम करणारे डॉ. मकरंद जोशी, आंतरराष्ट्रीय खेळाडू व दोनदा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित अमेय जोशी व आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कारार्थी सिद्धार्थ कदम यांनी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघातर्फे दि. 19 मार्च, 2022 रोजी घेण्यात आलेल्या Online पंच परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत उत्तीर्ण झाले.
जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारात प्रत्येक ऑलम्पिक स्पर्धेनंतर गुण प्रदान संहीता सुधारित करण्यात येते. यामुळे जिम्नॅस्टिक्सच्या प्रत्येक उपप्रकारात ऑलम्पिक स्पर्धेनंतर या बदललेल्या गुण प्रदान संहितेचे उद्बोधन वर्ग व परीक्षा घेतली जाते. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघातर्फे घेण्यात आलेल्या या गुण प्रदान संहितेची ही पंधरावी मालिका परीक्षा होती यात भारतातून एरोबिक जिम्नॅस्टिक साठी अकरा पंच परीक्षेस बसले होते या पैकी आठ पंच परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे.
डॉ. मकरंद जोशी हे सलग सहावेळा पंच परीक्षा मालिका यशस्वीरित्या उत्तीर्ण होणारे भारतातील पहिले पंच असून ते 2001 पासून एरोबिक जिम्नॅस्टिक्सचे आंतरराष्ट्रीय पंच म्हणून कार्यरत आहेत. भारतातील सर्वात ज्येष्ठ व अनुभवी पंच म्हणून त्यांची गणना होते. त्यांनी 2001 पासून केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पंचांच्या कामगिरीवरून त्यांची एशियन जिम्नॅस्टिक्स युनियन वर एरोबिक जिम्नॅस्टिक्सच्या तांत्रिक समितीचे सदस्य म्हणून 2019 पासून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सातत्याने गेल्या 21 वर्षापासून एरोबिक जिम्नॅस्टीक्सच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट पंचगिरी केल्यामुळे त्यांना एशियन जिम्नॅस्टिक्स युनियनच्या तांत्रिक समितीत सचिवपदाचा पदभार देण्यात आला आहे.
सिद्धार्थ कदम यांनी 2017 साली जिम्नॅस्टिक्स पंच परीक्षा मालिकेत उत्तीर्ण होऊन आपली पंच म्हणून कारकीर्द सुरू केली आहे. त्यांनी याहीवेळी उत्कृष्ट कामगिरी करत पंच म्हणून पात्रता मिळवली आहे. ते सध्या धुळे येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत.
महाराष्ट्रातर्फे अमेय जोशी यांनीही जिम्नास्टिक्सची पंधरावी पंच परीक्षा मालिका यशस्वीरित्या उत्तीर्ण केली असून त्यांना पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघातर्फे पंच पात्रतापत्र बहाल करण्यात आले. त्यांनी आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू तसेच प्रशिक्षक म्हणून सहभाग घेतलेला आहे. येथून पुढे ते आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणूनही कार्यरत होतील.
महाराष्ट्राच्या पंचांच्या यशस्वी कामगिरीबद्दल महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नास्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे उपाध्यक्ष उत्तम लटपटे, अॅड. संकर्षण जोशी, सहसचिव सागर कुलकर्णी, साईचे उपसंचालक नितीन जायस्वाल, क्रीडा व युवक सेवा संचालनालय औरंगाबाद विभाग उपसंचालक सुहास पाटील, साईचे प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे, संजय मोरे, मसांमचे अध्यक्ष रामभाऊ पातुरकर, हेमंत पातूरकर, प्राचार्य डॉ. शत्रुंजय कोटे, औरंगाबाद जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष आदित्य जोशी, जिम्नॅस्टिक्स मार्गदर्शक संजय गाढवे, तनुजा गाढवे, जिम्नॅस्टिकचे संघटनेचे सर्व पदाधिकारी इत्यादी सर्वांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.