मापुसा (प्रतिनिधी): वेंकटेश केंचेच्या दुहेरी गोलमुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील हॉकीमध्ये पश्चिम बंगालवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला.
मापुसा येथील पेड्डेम क्रीडा संकुलात चालू असलेल्या हॉकीच्या साखळी सामन्यात वेंकटेशने दुसऱ्याच मिनिटाला गोल करून महाराष्ट्राचे खाते उघडले. मग ११व्या मिनिटाला वेंकटेशने आणखी एक मैदानी गोल करीत पहिल्या सत्रात महाराष्ट्राला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
मग दुसऱ्या सत्रात १६व्या मिनिटाला अजिंक्य जाधवने मैदानी गोल नोंदवत ही आघाडी ३-० अशी वाढवली. नंतर २१व्या मिनिटाला राजेंद्र ओरमने बंगालचा पहिला गोल केला. पण तरीही मध्यंतराला महाराष्ट्राकडे ३-१ अशी वर्चस्वपूर्ण आघाडी होती.
तिसऱ्या सत्राच्या अखेरच्या मिनिटाला (४५वे मिनिट) तालिब शाहने महाराष्ट्राच्या खात्यावर चौथ्या गोलची भर घातली. त्यानंतर चौथ्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.
महाराष्ट्राने तीन सामन्यांत तीन विजय मिळवून एकूण ९ गुणांसह बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. रविवारी महाराष्ट्राचा साखळीतील शेवटचा सामना हरयाणाशी होईल.