अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य आहे. तालिबानने महिलांवर विविध निर्बंध लादले आहेत. १९९६-२००२ दरम्यान तालिबानने पहिल्यांदा अफगाणिस्तानवर कब्जा केला. यादरम्यानही त्यांनी महिलांचे शोषण केले. या राजवटीत एक मुलगी अफगाणिस्तान सोडून गेली होती आणि डेन्मार्कला पोहोचली. डेन्मार्कसाठी ती राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळली. मेहनतीने ती त्या संघाची प्रमुख खेळाडू बनली. आता ती डॉक्टर झाली आहे. नादिया नदीम असे या महिलेचे नाव असून तिची संघर्षगाथा थक्क करणारी आहे..
नादियाचा जन्म अफगाणिस्तानातील हेरात येथे झाला. तिचे वडील अफगाण नॅशनल आर्मीमध्ये जनरल होते, तालिबानने नादियाच्या वडिलांना मारले. वयाच्या ११ व्या वर्षी वडील गमावल्यानंतर नादियाने देश सोडला. खोट्या ओळखीखाली प्रवास करून अनेक निर्वासितांच्या छावण्या गाठल्या. ती पाकिस्तानातील कराचीला दोन महिने राहिली. यानंतर ती इटलीला पोहोचली, जिथे ती अनेक दिवस भटकत होती.
आयुष्यातील मोठा क्षण…
यानंतर डेन्मार्कच्या ग्रामीण भागातील निर्वासित शिबिरात नादियाला एका गार्डने दूध, टोस्ट आणि एक केळी खायला दिली. नादियाने त्या क्षणाचे वर्णन तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे क्षण म्हणून केले आहे. येथे असताना नादियाने काही मुलींना फुटबॉल खेळताना पाहिले. तिला फुटबॉल खेळायचे होते, पण कोणाला सांगावे ते कळत नव्हते. शेवटी धाडस करून ती त्या संघाच्या प्रशिक्षकापर्यंत पोहोचली. त्यावेळी तिला इंग्रजी येत नव्हते, पण तिला खेळायचे आहे, हे तिने प्रशिक्षकाला पटवून दिले.
फुटबॉलपटूनंतर सर्जन!
प्रशिक्षकाच्या होकारानंतर नादियाने खेळायला सुरुवात केली आणि मागे वळून पाहिले नाही. B52 आणि आल्बोर्ग संघासाठी फुटबॉल खेळून तिने कारकिर्दीची सुरुवात केली. २००९ मध्ये तिने पहिल्यांदा डेन्मार्कची जर्सी परिधान केली आणि संघासाठी अनेक सामने जिंकले.९८ आंतरराष्ट्रीय सामन्यात तिने २०० गोल केले. फुटबॉल खेळताना नादियाने वैद्यकीय शिक्षण घेतले. पाच वर्षांच्या अभ्यासानंतर गेल्या आठवड्यात ती सर्जन बनली. तिने ट्वीट करून ही माहिती दिली. ”मला नेहमीच लोकांना मदत करायची होती. फुटबॉल ही माझी आवड आहे, मी याकडे कधीच कारकिर्द म्हणून पाहिले नाही. मला विनामूल्य फुटबॉल खेळायलाही आवडेल”, असे नादियाने सांगितले.