हरमनप्रीतचा गोलचौकार; भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा;

अनुभवी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगने साकारलेल्या गोलचौकाराच्या बळावर भारताने पुरुषांच्या प्रो लीग हॉकीमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेचा १०-२ असा धुव्वा उडवला. भारताचा हा चार सामन्यांतील तिसरा विजय ठरला आहे.

टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताने गेल्या आठवडय़ात झालेल्या पहिल्या टप्प्यातील लढतीतही आफ्रिकेवर १०-२ असे वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठीही भारताचे पारडे जड मानले जात होते. त्यातच शनिवारी फ्रान्सकडून २-५ असा पराभव पत्करल्याने भारतीय हॉकीपटूंवर कामगिरी उंचावण्याचे दडपण होते.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारतासाठी हरमनप्रीतने अनुक्रमे १३, ५२व्या मिनिटाला पहिले दोन, तर ६०व्या मिनिटात आणखी दोन गोल नोंदवले. शिलानंद लाक्राने (२७वे, ४८वे मि.) दोन गोल झळकावत हरमनप्रीतला उत्तम साथ दिली. याव्यतिरिक्त सुरेंदर कुमार (१५वे मि.), मंदीप सिंग (२८वे मि.), सुमित (४५वे मि.) आणि शमशेर सिंग (५६वे मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. आफ्रिकेकडून डॅनियल बेल (१२वे मि.) आणि कोनोर ब्यूचॅम्प (५३वे मि.) यांनी दोन गोल नोंदवले.

या विजयासह भारतीय संघाने गुणतालिकेतील तिसरे स्थान भक्कम केले असून चार सामन्यांनंतर त्यांच्या खात्यात तीन विजयांचे नऊ गुण जमा आहेत. नेदरलँड्स (१६ गुण) आणि बेल्जियम (१० गुण) पहिल्या दोन क्रमांकावर विराजमान आहेत.

You might also like

Comments are closed.