फॉर्मातील बंगलोर ‘टॉप’च्या हैदराबादला गाठण्यास उत्सुक;

गोवा – हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) दुसऱ्या टप्प्यातील एका महत्त्वपूर्ण लढतीत शुक्रवारी (११ फेब्रुवारी) हैदराबाद एफसी आणि बंगलोर एफसी हे आठव्या हंगामातील टॉप फोरमधील क्लब आमनेसामने आहेत. सलग तीन विजय मिळवत फॉर्मात परतलेला माजी विजेता प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखताना स्थानासह गुणांतील फरक कमी करण्यास उत्सुक आहे.

बाम्बोलिन येथील अॅथलेटिक स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात अव्वल संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. खराब सुरुवातीनंतर मागील नऊ सामन्यात ‘विनलेस’ असलेल्या बंगलोरने १५ सामन्यांतून २३ गुणांसह तिसरे स्थान मिळवले आहे. आणखी एका विजयासह अव्वल स्थानी असलेल्या हैदराबादला ते आव्हान देऊ शकतील. हैदराबाद एफसीच्या नावावर १५ सामन्यांत २६ गुण आहेत. ‘टॉप’ला असलेल्या या क्लबने आठव्या हंगामात सर्वाधिक सात सामने जिंकलेत. मात्र, मागील लढतीत एटीके मोहन बागानने त्यांची सलग तीन सामन्यांची विजयी मालिका खंडित केली. त्यामुळे अव्वल चार संघांमधील अन्य प्रतिस्पर्धी आणि हैदराबाद यांच्यात केवळ एका विजयाचे (३ गुण)अंतर राहिले आहे. त्यात बंगलोरचाही समावेश आहे. परिणामी, अव्वल स्थान कायम राखण्याचे आव्हानही हैदराबादसमोर आहे.

प्रतिस्पर्ध्यांची बलस्थाने आणि कमकुवत बाबींपेक्षा आमच्या खेळावर आम्ही अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही मागील नऊ सामन्यांत हार पत्करलेली नाही. क्वारंटाइननंतर सांघिक कामगिरी आमुलाग्र बदल पाहायला मिळाला आहे. ही मॅच त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण होती. हैदराबादच्या पराभवामुळे आमच्यासह अन्य संघांना गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. मात्र, हैदराबाद एक चांगला संघ आहे, असे बंगलोर एफसीचे मुख्य प्रशिक्षक मार्को पेझाओली यांनी म्हटले आहे.

 

शुक्रवारच्या लढतीद्वारे बार्थोलोमेव ऑग्बेचे आणि सुनील छेत्री हे अव्वल खेळाडू आमनेसामने आहेत. दोघांच्या नावावर आयएसएलमधील सर्वाधिक गोलची नोंद आहे. या सामन्याद्वारे दोघेही विक्रमी पन्नासावा गोल करण्यास आतुर आहेत. ब्राझीलचा फॉरवर्ड क्लीटन सिल्वावरही बंगलोरची मदार आहे. त्याने यंदाच्या हंगामात सात गोल करताना ‘गोल्डन बुट’च्या रेसमध्ये स्वत:ला ठेवले आहे. हैदराबादला बंगलोरविरुद्ध ऑग्बेचेकडून खूप अपेक्षा आहेत. आठव्या हंगामात त्याने संघासाठी तब्बल २२ गोल करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यात त्याच्या यंदाच्या हंगामातील सर्वाधिक १४ गोलांचा समावेश आहे.

आठव्या आयएसएल हंगामाच्या पहिल्या टप्प्यात हैदराबादने बंगलोरला १-० अशी मात दिली आहे. त्यात सातत्य राखण्याचा प्रयत्न ते करतील. दुसरीकडे, मागील पराभवाचा बदला घेत विजयाचा ‘चौकार’ लगावण्यादृष्टीने बंगलोर संघ मैदानावर उतरेल.

You might also like

Comments are closed.