भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्माला आयपीएल मेगा ऑक्शन २०२२मध्ये कोणीही वाली लाभला नाही. इशांत अनसोल्ड ठरला. पण आता तो भारताची प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी इशांत शर्मा रणजी ट्रॉफीसाठी उपलब्ध नव्हता, पण नंतर त्याने आपली मानसिकता बदलली आणि खेळण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघासाठी १००हून अधिक कसोटी सामने खेळूनही इशांत आयपीएलमध्ये संघांना प्रभावित करू शकला नाही. त्याची मूळ किंमत दीड कोटी रुपये होती पण कोणीही त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. याशिवाय तो आता भारतीय कसोटी संघातूनही बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आदी गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे इशांत संघाबाहेर होण्याच्या मार्गावर आहे.
शतक
दिल्लीच्या रणजी संघाकडून खेळण्यापूर्वी इशांत शर्माला पाच दिवस क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. अशा परिस्थितीत तो २४ फेब्रुवारीपासून होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध असेल. प्रदीप सांगवान आणि नवदीप सैनी हे दिल्लीचे त्यांच्या पहिल्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत. नवदीप सैनीचा वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. त्यामुळे इशांतचा प्रवेश बायो बबल ते बायो बबल असेल आणि त्याला क्वारंटाइनमध्ये राहण्याची आवश्यकता नाही.
विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात इशांत शर्माचा समावेश करण्यात आला होता. मात्र, तेथे त्याला एकाही कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. इशांतने शेवटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न्यूझीलंडविरुद्ध खेळले होते.