पॅरिस –ऑफ-स्पिनर रामाधीन आणि डावखुरे फिरकीपटू अॅल्फ व्हॅलंटाइन या फिरकी जोडीने अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर वर्चस्व गाजवले,वेस्ट इंडिजचे माजी फिरकीपटू सोनी रामाधीन यांचे रविवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्रिनिदाद येथे १९२९ साली जन्मलेल्या रामाधीन यांनी दशकभराच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ४३ कसोटी सामन्यांत १५८ मोहरे टिपले. ऑफ-स्पिनर रामाधीन आणि डावखुरे फिरकीपटू अॅल्फ व्हॅलंटाइन या फिरकी जोडीने अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. या जोडीने १९५० साली पहिल्यांदा एकत्रित खेळताना इंग्लंडमध्ये ५९ गडी बाद केले होते. विंडीजच्या संघात त्यावेळी फ्रँक वॉरेल, एव्हर्टन विक्स आणि क्लाइड वॉलकॉट या उत्कृष्ट त्रिकुटाचा समावेश होता. मात्र, रामाधीन (२६ बळी) आणि व्हॅलंटाइन (३३ बळी) यांच्या कामगिरीमुळे विंडीजने इंग्लंडमध्ये पहिला कसोटी मालिकाविजय मिळवला. विंडीजने ही मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली होती.
रामाधीन यांनी ८ जून १९५० रोजी इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विंडीजचे प्रतिनिधित्व करणारे ते भारतीय वंशाचे पहिले खेळाडू ठरले. त्यांनी या सामन्याच्या दोन्ही डावांत दोन-दोन बळी घेतले. त्यांनी अखेरचा सामना १९६०-६१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. एका कसोटी सामन्यात सर्वाधिक चेंडू टाकण्याचा विक्रम आजही रामाधीन (७७४) यांच्या नावे आहे.