दिया चितळे उपांत्य फेरीत, रीथ रीशाला पराभवाचा धक्का

सूरत- पदकाचे आशा स्थान असलेल्या महाराष्ट्राच्या दिया चितळे हिने टेबल टेनिस मध्ये महिलांच्या एकेरीत उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र तिची सहकारी रीथ रीशा टेनिसन तिचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियम मध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत दिया चितळे हिला हरियाणाच्या सुहाना सैनी हिच्याविरुद्ध विजय मिळवताना शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला. रोमहर्षक लढतीनंतर तिने हा सामना ११-५, ४-११,११-७,३-११,११-५,८-११,१२-१० असा जिंकला.
दोन्ही खेळाडूंनी काउंटर ॲटॅक व टॉपस्पीन फटक्यांचा सुरेख खेळ केला. सांघिक विभागात महाराष्ट्राला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या चितळे शेवटपर्यंत संयम ठेवीत विजयश्री खेचून आणली.
पश्चिम बंगालच्या सांघिक विजेतेपदात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या सुतीर्था मुखर्जी हिच्या चतुरस्त्र खेळापुढे रीथ रीशा हिच्या खेळाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. मुखर्जी हिने हा सामना ११-९,१२-१०,११-८, १०-१२,११-९ असा जिंकला. चौथ्या गेम मध्ये रीथ रीशा हिने चांगला खेळ केला. ही गेम घेत तिने सामन्यात उत्सुकता निर्माण केली मात्र पाचव्या गेम मध्ये तिला चिवट लढतीनंतर पराभव पत्करावा लागला.
उपांत्य फेरीत दिया चितळे हिला राष्ट्रकुल स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या श्रिजा अकुला हिच्याशी खेळावे लागणार आहे तर मनेका बात्रा हिच्यापुढे सुतीर्था मुखर्जी हिचे आव्हान असणार आहे.
Comments are closed.