रोहित शर्माने टी२० संघाचा नियमित कर्णधार म्हणून त्याच्या भारतीय क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतील सुरुवातीचे २ सामने जिंकत भारताने आधीच मालिका खिशात घातली होता. त्यानंतर रविवारी (२१ नोव्हेंबर) भारतीय संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ७३ धावांनी पराभव केला आहे. यासह भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची टी२० मालिका ३-० ने जिंकली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या होत्या. रोहितने ५६ धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. परिणामी भारतीय संघाने या मालिकेत न्यूझीलंड संघाला व्हाइटवॉश देऊन एक विक्रम केला आहे
भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या सलग दुसऱ्या टी-२० मालिकेत क्लीन स्वीप केला. याआधी भारतीय संघाने न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर ५ सामन्यांच्या मालिकेत ५-० ने पराभूत केले होते.
भारतीय संघाने सर्वात प्रथम २०१० साली झिम्बाब्वे संघाला व्हाईटवॉश दिला होता. त्यानंतर २०१६ साली ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच मैदानावर व्हाईटवॉश दिला होता. दोन्ही संघात ३ सामने झाले होते. त्यानंतर २०१७ साली श्रीलंका संघाविरुद्ध भारतीय संघाने मालिकेतील तिन्ही सामने जिंकले होते. २०१८ साली भारतीय संघाने दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. तसेच आयर्लंड (२०१८) आणि वेस्ट इंडिज (२०१८, २०१९) विरुद्ध झालेल्या टी२० मालिकेतही भारतीय संघाने दोन्ही संघांना व्हाईटवॉश दिला होता.
असा झाला शेवटचा सामना
दरम्यान सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली. संघाने २ षटकात २१ धावा केल्या होत्या. यानंतर अक्षर पटेलने तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डॅरिल मिशेल (५) आणि सहाव्या चेंडूवर मार्क चॅपमन (०) यांना बाद करत प्रतिस्पर्धी संघाला २ जोरदार धक्के दिले. त्याने पुढच्याच षटकात ग्लेन फिलिप्सला (०) त्रिफळाचीत करून भारतीय संघाला सामन्यात पुढे केले. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याने दुसऱ्यांदा ३ विकेट घेतल्या आहेत.
न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने अर्धशतक झळकावत संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्याने ३६ चेंडूत ५१ धावा केल्या. ४ चौकार आणि ४ षटकार मारले. मात्र संघातील अन्य कोणताही खेळाडू खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही. न्यूझीलंड संघातील ८ खेळाडू दहाच्या आकड्याला स्पर्श करू शकले नाहीत. संपूर्ण संघ १७.२ षटकांत १११ धावांत गारद झाला. हर्षल पटेलनेही २ बळी घेतले. न्यूझीलंडवर भारताचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडवर भारताचा सर्वात मोठा विजय ५३ धावांचा होता.