श्रीलंका – अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला कामगिरी दाखवण्याची सुवर्णसंधी असेल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने शुक्रवारी म्हटले आहे. त्यामुळे श्रीलंका मालिकेआधी होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेऊन निवड समिती भारताचा संघ निवडेल.
‘रणजी करंडक स्पर्धेला १० फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. तर श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका ही मार्चमध्ये आहे. त्यामुळे रणजी स्पर्धेत रहाणे आणि पुजाराने सातत्याने धावा काढल्यास त्यांना संघातील स्थान टिकवता येईल. अर्थात हा निर्णय निवड समितीच्या अखत्यारित येतो,’’ असे गांगुलीने सांगितले
रणजी सामन्यांच्या संख्येत कपात झाल्यामुळे खेळाडूंना आर्थिक फटका बसेल, याबाबत गांगुली म्हणाला, ‘‘खेळाडू विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळल्याबद्दलही वाढीव मानधन मिळाले आहे. करोना साथीच्या काळात जैव-सुरक्षा परिघात रणजी स्पर्धेच्या आयोजनाबाबत आम्ही वैद्यकीय समितीशी चर्चा केली. त्यांच्या सल्ल्यानेच प्रत्येक गटात चार संघ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’’
आयपीएल’ भारतातच!
यंदाची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट भारतात व्हावी, याबाबत आम्ही आशावादी आहोत. योजनाही आमच्याकडे तयार आहे. देशातील करोना साथीच्या स्थितीचा आम्ही आढावा घेऊन याबाबत निर्णय घेऊ, असे गांगुलीने सांगितले.