सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचबाबत जवळपास दोन आठवडे चाललेल्या नाट्यावर अखेर रविवारी पडदा पडला असून ,ऑस्ट्रेलिया सरकारच्या व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात जोकोव्हिचने न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, केंद्रीय न्यायालयाने जोकोव्हिचचा अर्ज फेटाळल्यामुळे त्याची ऑस्ट्रेलियातून परत पाठवणी झाली.
करोना लस न घेता केवळ वैद्यकीय सवलतीच्या आधारे मेलबर्न येथे दाखल झालेल्या जोकोव्हिचचा व्हिसा ऑस्ट्रेलियाचे परदेशी नागरिकविषयक खात्याचे मंत्री अॅलेक्स हॉक यांनी विशेष अधिकार वापरून शुक्रवारी रद्द केला. त्यांच्या या निर्णयाला जोकोव्हिचने न्यायालयात आव्हान दिले.या प्रकरणावर रविवारी झालेल्या सुनावणीत केंद्रीय न्यायालयाच्या तिन्ही न्यायाधीशांनी एकमताने जोकोव्हिचच्या विरोधात निकाल दिला आहे.
विक्रमाची संधी हुकली-
केंद्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे जोकोव्हिचला आजपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळता येणार नाही. तब्बल नऊ वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोव्हिचला यंदा २१ ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी होती.जोकोव्हिच म्हणाला माझा अर्ज फेटाळण्यात आला असून, न्यायालयाच्या या निर्णयाने मी प्रचंड निराश झालो आहे.