मुंबई (प्रतिनिधी): विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाने आपली ताकद दाखवून देताना एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेत इंडोनेशियाचा १८-० गोलने फडशा पाडला. अंधेरी येथील फुटबॉल एरिना स्टेडियममध्ये तुफानी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने दणक्यात विजयी सलामी दिली.
दिग्गज खेळाडू टिम काहिल याच्या नावावर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीयन गोल करण्याचा विक्रम मोडताना समंथा केरने इंडोनेशियाविरुद्ध वर्चस्व राखले. तिने या सामन्यात पाच गोल केले आणि यासह तिने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक गोल करणाºयाचा सर्वकालीन खेळाडूचा मान मिळवला. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा हा महिला आशिया चषक स्पर्धेतील सर्वात मोठा विजयही ठरला. इंडोनेशियाचा एकतर्फी पराभव झाला असला तरी त्यांनी सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये शानदार बचाव करत प्रभावी खेळ केला. परंतु, त्यांचा बचाव नवव्याच मिनिटाला भेदला गेला. एमिली वॅन एगमंडने दिलेल्या पासवर केरने ५०वा आंतरराष्ट्रीय गोल करत ऑस्ट्रेलियाचा स्पधेर्तील पहिला गोल नोंदवला. यानंतर ऑस्ट्रेलियाने जणू काही गोलांचा पाऊसच पाडला. पहिला गोल करत केरने काहिलच्या विक्रमाची बरोबरी केली आणि यानंतर केवळ दोन मिनिटांनीच तिने हा विक्रम मोडत ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोल नोंदवला.
केरच्या गोलने चार्ज झालेल्या ऑस्ट्रेलियाने आणखी वेग पकडला. कैटलिन फूर्डने १४व्या मिनिटाला, मेरी फॉलरने १७व्या मिनिटाला आणि हीली रासोने २४व्या मिनिटाला गोल करत ऑस्ट्रेलियाला ५-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
ऑस्ट्रेलियाच्या या धडाकेबाज खेळापुढे इंडोनेशियाची लय पूर्णपणे बिघडली. सामन्यात थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न करत असतानाच पुन्हा एकदा केरचा जलवा दिसला आणि तिने २६व्या मिनिटाला मिळालेली पेनल्टी किक सत्कारणी लावत हॅटट्रिक पूर्ण केली. हाच धडाका कायम राखत ऑस्ट्रेलियाने मध्यंतराला ९-० अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला.
दुसऱ्या सत्रातही इंडोनेशियाचा ऑस्ट्रेलियाचा वेग रोखता आला नाही. बघता बघता ऑस्ट्रेलियाने १२-०, १५-० अशी भलीमोठी आघाडी घेत इंडोनेशियाची हवा काढली. ७१व्या मिनीटाला क्याह सिमोनने केलेल्या गोलच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १६-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने इंडोनेशियाच्या कमकुवत बचावफळीचा फायदा घेत त्यांना फुटबॉलचे धडेच दिले. एकामागून एक गोल होत असल्याचे पाहून इंडोनेशियानेही पुनरागमनाचे प्रयत्न सोडून दिले. ऑस्ट्रेलियाचा हा विजय स्पर्धा इतिहासातील गेल्या २० वर्षांतील सर्वात मोठा विजय ठरला.
ऑस्ट्रेलियाकडून केरने ९व्या, ११व्या, २६व्या, ३६व्या आणि ५४व्या मिनिटाला गोल करत शानदार कामगिरी केली. यासह एमिली वॅन एगमंडने चार, हीली रोसो, क्याह सिमोन आणि एली कार्पेंटर यांनी दोन, तसेच कैटलिन फूर्ड, मेरी फॉलर आणि ऐवी ल्युक यांनी प्रत्येकी एक गोल केला.
या दिमाखदार विजयासह ब गटातून ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावत संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीतील सर्व खेळाडूंना इशारा दिला. सोमवारी ऑस्ट्रेलिया आपल्या दुसऱ्या सामन्यात फिलिपाईन्सविरुद्ध खेळेल, तर इंडोनेशिया थायलंडच्या आव्हानाला सामोरे जाईल