आगामी ‘एएफसी’(AAFC) आशियाई चषक स्पर्धेमुळे भारतात महिला फुटबॉलच्या प्रसाराला गती मिळेल आहे .आणि देशाच्या कानाकोपऱ्यात हा खेळ पोहोचेल, असा विश्वास भारतीय महिला संघाची कर्णधार आशालता देवीने व्यक्त केला.
भारताला यंदा पहिल्यांदाच महिलांच्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी लाभली आहे. २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेचे सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे रंगणार आहेत. आशियाई स्पर्धेच्या आयोजनामुळे देशातील युवा पिढीला फुटबॉल खेळण्याची प्रेरणा मिळेल, असे आशालताला वाटते.
‘‘या स्पर्धेचा भारतातील महिला फुटबॉलवर सकारात्मक प्रभाव पडेल. भारताने याआधी इतक्या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. आपल्या देशात अजूनही अनेकांना महिला फुटबॉलविषयी फारशी माहितीही नाही. मात्र, आशियाई स्पर्धेमुळे फुटबॉल हा खेळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल आणि महिला फुटबॉलच्या प्रसाराला गती मिळेल अशी माझी धारणा आहे, असे आशालता म्हणाली.
भारतीय संघाला आशियाई चषक स्पर्धेमार्फत २०२३ सालच्या महिला विश्वचषकासाठी पात्र ठरण्याची संधी आहे. ‘‘विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणे हे आमचे स्वप्न आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेत सर्व सामने जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल. आमचे या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठत पहिल्यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरण्याची ऐतिहासिक कामगिरी करण्याचे आमचे लक्ष्य आहे,’ असेही आशालताने नमूद केले.
आशियाई चषकात १२ संघांना तीन गटांमध्ये विभागण्यात आले असून भारताचा अ-गटात समावेश आहे. त्यांचे इराण (२० जानेवारी), चायनीज तैपेइ (२३ जानेवारी) आणि चीन (२६ जानेवारी) यांच्याशी साखळी सामने होतील. तिन्ही गटातील अव्वल दोन संघ आणि दुसऱ्या स्थानावरील दोन सर्वोत्तम संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील.
.. म्हणून आत्मविश्वास दुणावला!
आशियाई चषक स्पर्धेपूर्वी ब्राझील, चिली आणि व्हेनेझुएला या तीन बलाढय़ संघांविरुद्ध सामने खेळल्याने भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावल्याचे मत आशालताने व्यक्त केले. ‘‘ब्राझीलमध्ये खेळलेल्या तीन सामन्यांतून आमच्या संघाला खूप शिकायला मिळाले. तांत्रिकदृष्टय़ा दर्जेदार खेळ करणाऱ्या दक्षिण अमेरिकन संघांना आम्ही चांगला लढा दिला. त्यामुळे आमच्या खेळात खूप सुधारणा झाली असून, आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. आशियाई स्पर्धेत यशस्वी कामगिरीसाठी भारतीय महिला संघ सज्ज आहे, असे आशालताने ठामपणे सांगितले आहे.