औरंगाबाद(प्रतिनिधी)- क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला धमकी दिल्याचे तसेच क्रीडा संकूलावर सराव करण्यासाठी आलेल्या मुलांना धमकावत त्यांची व्हिडीओ शुटींग केल्याचे प्रकरण ताजे असतानाच समाजसेवक म्हणविल्या जाणाऱ्या प्रशांत साठे याने पून्हा सरावासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याला पास आहे का म्हणत शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी १९ वर्षीय विद्यार्थ्याने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली असता, प्रशांत साठेविरोधात एनसी दाखल करण्यात आली आहे. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर येथे घडली.
याप्रकरणी ज्ञानेश्वर जनार्धन गुरमे (१९, रा. मयुरपार्क, मारोतीनगर, हर्सूल) याने जवाहरनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार साठे आणि गुरमे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गुरमे हा मंगळवारी सायंकाळी सात वाजेदरम्यान सरावासाठी क्रीडा संकूलावर आला असता, साठे याने तुझ्याकडे पास आहे का अशी विचारणा केली, त्यावर गुरमे याने पास असल्याचे सांगूनही गुरमेला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान गुरमेसोबत असलेल्या रोहित गाडेकर यांनाही साठे याने शिवीगाळ करत तुम्ही बाहेर या तुमचे हातपाय तोडून टाकीन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी साठेविरोधात एनसी दाखल असून पुढील तपास अंमलदार ठोंबरे करत आहेत.