विराट कोहली शनिवारी टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी याबाबत आपलं मत मांडले आहे. विराट कोहली बराच काळ दबावात दिसत होता. आता त्याला अहंकार सोडून नव्या कर्णधाराच्या हाताखाली खेळावे लागणार आहे, असे कपिल देव म्हणाले.
टी-२० वर्ल्डकपनंतर कोहलीने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडले. यानंतर त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि रोहित शर्माकडे वनडे आणि टी-२०ची कमान सोपवण्यात आली. यानंतर बीसीसीआय आणि कोहली यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराटने कसोटी कर्णधारपदही सोडले.
कपिल देव म्हणाले, सुनील गावसकर माझ्या हाताखाली खेळले. मी श्रीकांत आणि अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळलो. मला कधीच अहंकार नव्हता. विराटलाही आपला अहंकार सोडून युवा क्रिकेटपटूच्या हाताखाली खेळावे लागेल. त्यामुळे त्याला आणि भारतीय क्रिकेटला मदत होईल. विराटला नव्या कर्णधाराला मार्गदर्शन करावे लागणार आहे. एक फलंदाज म्हणून विराटला आपण गमावू शकत नाही.