मुंबई | प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांनी आज आपल्या कुटुंबासह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सद्यस्थितीत अत्यंत हलाखीचे जीवन जगत असलेल्या कांबळी कुटुंबाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा मोठा हात देण्याचे आश्वासन दिले आहे.
या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एका मोठ्या जबाबदारीचा स्वीकार करत कांबळी यांना मोठा दिलासा दिला. त्यांनी विनोद कांबळी यांच्या औषधोपचाराचा संपूर्ण खर्च तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्याची ग्वाही दिली आहे. यामुळे कांबळी कुटुंबाच्या भविष्याची चिंता मिटली असून त्यांना एक भक्कम आधार मिळाला आहे.
एकेकाळी टीम इंडियासाठी मैदान गाजवणारे विनोद कांबळी सध्या अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळते. अलीकडेच त्यांचा एका आश्रमातील व्हिडिओ समोर आला होता, ज्यानंतर त्यांच्या प्रकृती आणि सद्यस्थितीबाबत सर्वत्र मोठी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मिळालेल्या या मोठ्या मदतीमुळे कांबळी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.






