नवी दिल्ली | प्रतिनिधी
तायक्वांदोच्या राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या मान्यतेसंदर्भातील प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय क्रीडा सचिव हरी रंजन राव यांच्याकडून ४ आठवड्यांच्या आत स्थिती अहवाल मागितला आहे. न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या पीठासमोर २० नोव्हेंबर २०२६ रोजी याविषयी सुनावणी पार पडली. न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचा दावा करत तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाने ही अवमान याचिका दाखल केली आहे.
या प्रकरणाची मूळ पार्श्वभूमी २७ एप्रिल २०२६ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशाशी जोडलेली आहे. W.P.(C) ३५२८/२०२२ या रिट याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने क्रीडा सचिवांना १५ दिवसांत एका तात्पुरत्या (ॲड-हॉक) समितीची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. राष्ट्रीय क्रीडा महासंघाची (NSF) सर्व कामे व कर्तव्ये या समितीने पार पाडावीत असे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच राष्ट्रीय महासंघ म्हणून मान्यता मिळवण्याबाबत दाखल केलेल्या निवेदनावरही निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते.
मात्र, एप्रिल महिन्यातील या आदेशाचे पालन न झाल्याचा आरोप करत तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाने न्यायालय अवमान कायद्याच्या कलम ११ आणि १२ अंतर्गत CONT.CAS(C) २१२०/२०२६ या क्रमांकाची अवमान याचिका दाखल केली. केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाचे सचिव हरी रंजन राव यांना या याचिकेत प्रतिवादी बनवण्यात आले आहे.
आगाऊ नोटीस दिल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान क्रीडा सचिवांच्या वतीने वकील न्यायालयात हजर राहिले. एप्रिलमधील आदेशानंतर आतापर्यंत काय कार्यवाही झाली, याचा स्थिती अहवाल देण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे वेळेची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने अहवाल सादर करण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत दिली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ फेब्रुवारी २०२७ रोजी निश्चित केली आहे. तात्पुरती समिती आणि मान्यतेबाबत मंत्रालय काय पावले उचलते, याकडे आता तायक्वांदो खेळाडूंसह संपूर्ण क्रीडा वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- मयंक यादवचा मोठा खुलासा, राजस्थान रॉयल्समध्ये जाण्याबाबत शेन बाँड यांच्याशी झाली ‘सिक्रेट चर्चा’
- छत्रपती संभाजीनगर वरिष्ठ क्रिकेट संघाची निवड चाचणी सोमवारी; एमसीए लीगला १० डिसेंबरपासून सुरुवात
- रोहितला आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी कॅप्टन बनवलं, पण त्याच्या विचारांची पद्धत एकदम वेगळी; पाहा ‘कॅप्टन थिंकिंग’







