स्पोर्ट्स पॅनोरमा | विशेष प्रतिनिधी
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्सदरम्यान एका धक्कादायक घटनेने क्रीडा वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारतीय पॅरा-जलतरणपटू मोहम्मद शम्स आलम शेख (वय ४०) याच्यावर हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ तसेच विनयभंग केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी जपानी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, घटनेच्या दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी त्याला तातडीने भारतात परत पाठवण्यात आले आहे.
भारतीय टीमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल आणि संपूर्ण भारतीय टीमची बदनामी केल्यामुळे, भारतीय पॅरालिम्पिक समितीकडून या खेळाडूवर आजीवन बंदी घालण्याचा विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कथित घटना सोमवारी नागोया शहरातील ‘फोर पॉइंट्स बाय शेराटन’ या हॉटेलमध्ये घडली, जिथे भारतीय पॅरा-जलतरण संघाचे खेळाडू थांबले होते. हाऊसकीपिंगचे काम करण्यासाठी एक महिला कर्मचारी या खेळाडूच्या खोलीत गेली होती. अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यानुसार, खेळाडूने या महिला कर्मचाऱ्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला, अश्लील हावभाव केले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
या गैरप्रकारानंतर घाबरलेली महिला कर्मचारी तातडीने खोलीच्या बाहेर पडली व तिने आपल्या वरिष्ठांना या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. तक्रार दाखल झाल्यानंतर जपान पोलिसांनी मोहम्मद शम्स आलम शेखला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. भारतीय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई करत न्यायालयीन खटला चालवण्याची मागणी केली होती. तसेच जपानी भाषेत असलेल्या पोलीस तक्रारीत लैंगिक अत्याचाराचा आरोप नमूद असल्याचा दावाही त्यांनी केला.
या गंभीर परिस्थितीनंतर स्थानिक आयोजन समितीने हस्तक्षेप करत भारतीय टीमच्या शेफ-डी-मिशन कार्यालयाला या कथित घटनेची माहिती दिली. भारतीय पथकाला संबंधित महिला कर्मचाऱ्याची लेखी माफी मागण्यास आणि आरोपी खेळाडूला जपानमधून मायदेशी पाठवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार शेखला रात्रीसाठी दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले व मंगळवारी नागोया येथून थेट भारतात पाठवण्यात आले. या सर्व प्रकारामुळे भारतीय पथकाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी अधिकाऱ्यांना पोलीस ठाणे आणि हॉटेलमध्ये चर्चेसाठी अनेक तास खर्ची घालावे लागल्याची खंतही संबंधित अधिकाऱ्याने व्यक्त केली.










