पणजी: महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक्सपटूंनी गोवा येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुरुवारी पाच सुवर्ण आणि दोन कांस्य अशी एकूण सात पदके मिळवत छाप पाडली. याचप्रमाणे मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये दोन रौप्य, दोन कांस्य पदके प्राप्त केली. याशिवाय वेटलिफ्टिंगमध्ये कोल्हापूरच्या रणजित चव्हाणला रौप्यपदक मिळाले. तर पेनाक सिलाट प्रकारात तीन कांस्य पदके मिळाली. महाराष्ट्राने आज ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण १५ पदके कमावली. आतापर्यंत महाराष्ट्राने ८ सुवर्ण, ८ रौप्य आणि ११ कांस्य अशी एकूण २७ पदके मिळवली आहेत.
जिम्नॅस्टिक्स महाराष्ट्राचे ‘सुवर्णपंचक’
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जिम्नॅस्टिक्समध्ये आपला दबदबा कायम राखत गुरुवारी ‘सुवर्णपंचक’ साकारले. ॲक्रोबॅटिक्समधील दुहेरीच्या तीन गटांत, महिलांच्या ट्रायो गटात आणि तालबद्ध जिम्नॅस्टिक्स प्रकारात महाराष्ट्राला हे नेत्रदीपक यश मिळाले.
पुरुषांच्या दुहेरीमध्ये आदित्य खसासे व आकाश गोसावी यांनी ६८.४३ गुणांची नोंद करीत सुवर्णपदक जिंकले. चंडीगड व उत्तराखंडच्या खेळाडूंनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. महिलांच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या प्रीती एखांडे व ऋतुजा जगदाळे या विजेत्या ठरल्या. त्यांनी ६८.३२ गुण मिळविले. पश्चिम बंगाल व दिल्लीच्या खेळाडूंना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. मिश्र दुहेरीत महाराष्ट्राच्या आचल गुरव व आशुतोष रेणावकर यांनी ६८.१९ गुणांसह विजेतेपद पटकाविले. कर्नाटक व पश्चिम बंगालच्या खेळाडूंना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक देण्यात आले.
महिलांच्या ट्रायोगटात अक्षता ढोकले, एरना पाटील व सोनाली बोराडे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अप्रतिम कौशल्य दाखवत सुवर्णपदक जिंकले. त्यांनी ७०.७८ गुण मिळवले. पश्चिम बंगाल व दिल्लीच्या खेळाडूंनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवले. श्रद्धा तळेकरला कलात्मक जिम्नॅस्टिक्स प्रकारात कांस्य पदक मिळाले.
तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या संयुक्ता काळेने ९६.४० गुण मिळवत सुवर्णपदक मिळवले, तर निशिका काळेने ८५.९५ गुण मिळवून कांस्य पदक मिळवले. हरयाणाच्या लाईफ अडलाखाला (९०.०४) रौप्य पदक मिळाले. संयुक्ता आणि निशिका यांचे महाराष्ट्राच्या सांघिक सुवर्ण पदकातील योगदान महत्त्वाचे होते.